जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था १० जुलै : भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अनेक राज्यांत अजूनही कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु आहे. केरळमध्ये तर अद्यापही दैनंदिन रुग्णांची आकडेवारी पाच आकडी नोंदवली जात आहे.

अशा परिस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत.

जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लाट सध्या धुमाकूळ घालत असून गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याचं स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचं चित्र दिसत असून कोरोनाचं आव्हान पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचंच हे चिन्ह आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या आक्रमणाला सध्याचा डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत असून भारताप्रमाणे इतर देशांनाही या व्हायरसचा धोका असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्षेत्रातील ५ पैकी ४ भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. आफ्रिकेत मृत्युदर वाढला असून एका आठवड्यात तो ३० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावणं आणि सुऱक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीत असणारा ढिसाळपणा या दोन कारणामुळे पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.

अनेक देशात निर्बंध हटवले

अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना आटोक्यात आल्यामुळं मास्कची सक्ती हटवण्यात आली आहे. बाजारपेठा सुरू होत आहेत. अशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या शक्यतेमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.

 

हे देखील वाचा :

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

वाहतूक पोलीसांशी हुज्जत व शिवीगाळ करणे पती-पत्नी दांपत्याला पडलं महागात!

मोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

 

 

delta plus variantlead story