डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा करणार – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी चिंचोली शांतीवनाला भेट देऊन विकासकामांची केली पाहणी. "बाबासाहेबांची ग्रंथसंपदा युवावर्गापर्यंत पोहचविणार" असे आवाहनही प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी केले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ८ डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू व साहित्यांचा बहुमूल्य वारसा नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर रोड वरील चिंचोली येथील शांतीवन येथे जतन करण्यात आला आहे. यासाठी वस्तुसंग्रहालयासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या विकासकामांसंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

चिंचोली येथील शांतीवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तुंचे जतन तसेच या वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची पाहणी श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी आज केली. तसेच येथील निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त संजय पाटील, भन्ते डॉ. जी. नागराजन, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे आणि भाग्यशाली गजभिये आदी यावेळी उपस्थित होते.

शांतीवन येथील संग्रहालय परिसर सुमारे अकरा एकराचा असून, या ठिकाणी विपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र, तसेच अभ्यासिकासुद्धा तयार करण्यात येत आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. वस्तुसंग्रहालयाचा प्रकल्प पूर्णत्वास येत असून आवश्यक सुविधांसाठी शासनस्तरावर निधी मंजूर करताना आवश्यक त्रुटींची पूर्तता करावी लागणार आहे. यासंदर्भात मंत्रालयस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.

शांतीवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले, संपादित केलेले ग्रंथ सर्वसामान्य जनतेसाठी तसेच युवकांसाठी उपलब्ध व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथसंपदेचे विक्रीकेंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासह इतर सर्व विकासकामे नागपूर सुधार प्रन्यासमार्फत सुरु आहेत. यासंदर्भांत जिल्हाधिकारी तसेच नासुप्रचे सभापती यांनाही येथील येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी शांतीवन परिसराची पाहणी केली. तसेच येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त संजय पाटील यांनी श्रीमती लवंगारे –वर्मा यांना परिसरातील विकासकामांची माहिती दिली.

हे देखील वाचा :

मोठी बातमी: हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

डॉ. प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना कळले नसल्याने उडाली तारांबळ

 

lead newsprajaktlavangarevarma