लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
इस्लामाबाद, दि. ३ : पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाचा विस्फोट झाला असून गेल्या १५ वर्षांत प्रकरणांमध्ये तब्बल २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१० मधील १६ हजार रुग्णसंख्या २०२४ मध्ये थेट ४८ हजारांवर पोहोचली आहे. WHO च्या मते, पूर्व भूमध्यसागरीय प्रदेशातील सर्वात जलद पसरणारी HIV साथ सध्या पाकिस्तानच सामना करत आहे.
‘डॉन’च्या अहवालानुसार, जागतिक एड्स दिनानिमित्त WHO व UNAIDS आयोजित रॅलीत ही भीषण माहिती जाहीर झाली. पूर्वी मुख्यत्वे उच्च-जोखीम गटांपुरता मर्यादित असलेला HIV आता सामान्य नागरिकांमध्ये, अगदी लहान मुलांपर्यंत झपाट्याने पसरत आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये सुमारे ३.५ लाख लोक HIV संक्रमित आहेत, परंतु ८०% लोकांना आपल्या संसर्गाची कल्पनाही नाही, ही सर्वात चिंताजनक बाब मानली जाते. बालकांमध्ये संसर्गाचा वेग विशेष धोकादायक असून ०–१५ वयोगटातील नवीन प्रकरणे २०१० मधील ५३० वरून २०२३ मध्ये १८०० पर्यंत वाढली आहेत.
WHO ने इशारा दिला आहे की, चाचणी, उपचार आणि जनजागृती मोहिमा तात्काळ वाढविल्या नाहीत, तर पाकिस्तानमध्ये HIV साथ नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.