ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात दहशतवादी हल्ला; तीन ठार, अनेकजण जखमी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रिया पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीमध्ये असताना दहशतवादी हल्ला झाला आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार असल्यामुळे बार आणि रेस्टॉरंटमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण यादरम्यान व्हिएन्नामध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक हल्लेखोर असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या हल्ल्यात पोलिसांनी एका संशयिताला ठार केल्याची माहिती ट्विरवरून देण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला अनेक संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने करण्यात आला. हा गोळीबार सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून केला जात होता. सोमवारी रात्री ८च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली होती.

दरम्यान हा गोळीबार दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी केलं आहे. या हल्ल्यानंतर सर्वत्र परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसंच अन्य संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आलं आहे. या शोध फक्त व्हिएन्नापुरता मर्यादित नाही आहे, असं ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

vienna-terrorist-attack