समाजाचे उर्जास्त्रोत…संत रामराव महाराज..
काय सांगू आता संतांचे उपकार |
मज निरंतर जागविती ||
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई |
ठेविता हा पायी जीव थोडा ||
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वरील ओळींप्रमाणे संतांचे विचार व आचार समाजातील प्रत्येक घटकाला उर्जा व प्रेरणा देणारेच असतात. आयुष्यात आपण नेहमी चांगले व आदर्श कार्य करण्याकरीता आपल्याला निरंतर जागवित असतात. अश्याच आपल्या विचारातून व प्रत्यक्ष कृतीतून बंजारा समाजाला जागृत करणारे व समाजाचे उर्जास्त्रोत असलेले पोहरादेवी संस्थानचे प्रमुख महान,तपस्वी,बाल ब्रम्हचारी संत श्री.रामराव महाराज यांच्या दु:खद निधनाची बातमी दिनांक 30 ऑक्टोबर 2020 ला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अकराच्या सुमारास कानावर आली आणि प्रचंड धक्का बसला…ही वार्ता समाजात पसरताच सर्वदूर दुःखाची लहर पसरली.
बंजारा समाजाचे कुलदैवत असलेले संत श्री.सेवालाल महाराज यांचे वंशज म्हणून संत श्री.रामराव महाराज यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत साधेपणा जपला…संपूर्ण भारतात करोडो भक्तसमुदाय असलेल्या तपस्वी रामराव महाराजांचा जन्म वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे वडील तपस्वी परशुराम व जगदंबा मातेची निस्सीम भक्त असलेल्या पुतळायाडी (आई) यांच्या पोटी 7.7.1935 रोजी झाला…गुरुपोर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या संत रामराव महाराजांवर माता जगदंबा व दैवत संत सेवालाल महाराज यांचे आशीर्वाद होते. वडील परशुराम महाराज यांनी रामराव महाराज हे पुतळा याडीच्या (आईच्या) पोटात असतांना माता जगदंबा व संत सेवालाल महाराज यांची अनेक वर्ष कठीण तपस्या केली आणि रामराव महाराज या तपस्वीचा जन्म झाला असे समाजातील अनेक कीर्तनकार आपल्या भजनातून मांडतात…
कवी व भजनकार राजुदास महाराज यांच्या भजनातील संदर्भानुसार तपेवाळेन लागगो टीळा…या ओवी नुसार वडील परसुराम महाराज यांनी 1948 साली संत रामराव महाराज यांना भक्तीचा टीका लावत भक्तीच्या आखाड्यात संपूर्ण समाजाची सेवा करण्यास उतरविले…1948 साली त्यांनी पोहरादेवी येथे समाजाची सेवा करण्याचे व्रत स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्यभराकरिता अन्नत्याग केला…ते फक्त कडूनिंब,दुध व फळांचे सेवन करीत असत…आयुष्यभर ब्रम्हचारी राहून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले.पोहरादेवी संस्थानचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यात शुध्द आचरण व समर्पित सेवेला सर्वोच्च स्थान दिले.
समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती निर्मुलन याकरिता ते सतत आग्रही असत…अशिक्षित व रूढीवादी असलेल्या बंजारा समाजाने शिकले पाहिजे कारण शिक्षित समाज हाच प्रगती करू शकतो असे ते आपल्या प्रवचनात नेहमी म्हणत होते. समाजातील प्रत्येकाने माता-पिता व गुरूच्या आज्ञेचे पालन करावे, संसारात घरातील पुरुषाने नेकीने म्हणजे प्रामाणिक राहत घराला मंदिराचे स्वरूप द्यावे, मातृभूमीची सेवा करावी, लबाडीबोली म्हणजे खोटे बोलू नये, समाजाच्या वेशभूषा व बोलीभाषेचा अभिमान बाळगावा, व्यसनापासून समाजाने दूर राहावे, बालविवाह करू नये, हलाली खाऊ नये म्हणजे मेहनत करूनच आयुष्य चालवावे असे विविध महत्वपूर्ण व आदर्श संदेश त्यांनी समाजाला वेळोवेळी दिले आहे…प्राणीमात्रांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात गोसेवेला प्राधान्य दिले सोबतच समाजाला मार्गदर्शन करतांना नेहमी सांगत की प्रत्येकाने गोसेवा करावी व खाटकाला गाय विकू नये. आपल्या आयुष्यातील साधेपणा व शुद्धतेमुळे त्यांचा सगळे नेहमी आदर करीत असे….बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता ते आयुष्यभर झटले…अखिल भारतीय बंजारा समाजाला एकत्रित आनन्याचे कार्य केले. सोबतच लाखो तांडयात फिरून जागृती तर केलिच सोबत अनेकांना व्यसनमुक्तही केले.त्यांची उपेक्षित समाजाप्रती असलेली निष्ठा, समाजात केलेले सकारात्मक परिवर्तन, बंजारा समाजाला दिलेली दिशा व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांनी दिलेला लढा इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन कर्नाटक मधील गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डी.लिट या मानद पदवीने गौरवान्वित केले.
बंजारा समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक विचारपिठावर ते नेहमी समाजाला उर्जा देण्याचे कार्य करीत असत. भक्तीच्या आखाड्यात उतरून समाजाला समृध्द करण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. भक्तीच्या मार्गानेच आयुष्यात शुद्धता व समृद्धता टिकविता येते हा त्यांचा विश्वास होता. आपल्या प्रवचनातून समाजाला जागृत करण्यासाठी संपूर्ण भारतभर प्रवास करून समाजाला दिशा दिली….म्हणूनच आजही समाजात संत सेवालाल महाराज यांच्या बरोबरच संत रामराव महाराज यांचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे…आजही समाजात बंजारा काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीचे महत्व संत रामराव महाराज यांनी अबाधित ठेवले आहे. दरवर्षी गुरुपोर्निमेला लाखो समाजबांधव पोहारादेवीत त्यांच्या आशीर्वादाकारिता येतात… दरवर्षी रामनवमीला पोहरादेवी येथे भव्य यात्रा भरत असते…या रामनवमी यात्रेत जगभरातून करोड़ो समाजबांधव सहभागी होऊन माता जगदंबा, संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांचे दर्शन घेतात…याच रामनवमीच्या पार्श्वभूमीवर 2017 साली पोहरादेवी येथे संत रामराव महाराज यांच्या उपस्थितीत विश्वशांती करिता भव्य लक्षचण्डी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते…यात राज्याच्या मुख्यमंत्री पासून अनेक नेते व संत सहभागी झाले होते. पोहरादेवी येथे जाऊन माता जगदंबा व सेवालाल बापू सोबतच रामराव बापू यांचे दर्शन घेतले की नवीन उर्जा मिळते ही समाजातील प्रत्येकाची भावना…म्हणून म्हणतात…
पोहरानं गोतो कायी रं,
पाघडी वाळो भिया….
पोहरानं जान बापू,याडी न धोको कायी रं,
पाघडी वाळो भिया..!
@ बाळू दत्तात्रय राठोड
यवतमाळ- 9881323543
Comments are closed.