Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकतर्फी प्रेमामधून ओबीसींनी बाहेर यावं! – ज्ञानेश वाकुडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओबीसी समूह हा तसा भोळा आहे. फार छक्केपंजे त्याला माहित नाहीत. कुणीही जरासं प्रेमानं बोललं की लगेच तो विरघळून जातो.

सामाजिक, राजकीय बाबतीत ओबीसी गोंधळलेला आहे. अजूनही त्याला त्याची राजकीय दिशा गवसली नाही. आजच्या परिस्थितीत ओबीसी समाजाकडे स्वतःचा असा कुणीही हक्काचा नेता नाही. हे विधान कदाचित धक्कादायक वाटेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

समजा तुमचा एक मित्र आहे. तुमचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. तो तुम्हाला मोठा माणूस वाटतो, कारण तो अंबानीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे ! तो सुद्धा त्यानिमित्तानं गाडीत बसताना फोटो काढून तुमच्यावर इम्प्रेशन मारतो. पण तुमच्यासाठी तो अंबानीची गाडी वापरू शकतो का ? तुम्हाला फिरायला घेवून जाऊ शकतो का ?

विविध राजकीय पक्षात असलेले ओबीसी समाजाचे आमदार, खासदार, मंत्री हे त्या ड्रायव्हर सारखे आहेत. तुम्हाला महागड्या गाडीत जरी बसलेले दिसत असले, तरी त्यांचे मालक म्हणतील तिकडेच त्यांना गाडी न्यावी लागेल, हे लक्षात घ्या. अर्थात् ते त्या त्या पक्षाच्या नेत्यांचे गुलाम आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विविध राजकीय नेत्यांना याच कसोटीवर आपण तपासून पाहू. त्यासाठी आजच्या परिस्थितीत राजकीय, सामाजिक नेता कुणाला म्हणता येईल, हे आपण ढोबळ मानानं बघू या.
( अर्थात..ही काही राज्यशास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय व्याख्या नव्हे. विषय समजून घेण्यासाठी केवळ ही उदाहरणं आहेत. यातील प्रत्येक नेत्याच्या विचाराशी मी सहमत आहे, किंवा समर्थक अथवा विरोधक आहे, असाही त्याचा अर्थ नाही. )

१) जनतेच्या हिताची, कल्याणाची त्याची स्वतःची काही ठोस भूमिका आहे का ? भूमिका चूक किंवा बरोबर असू दे.. पण त्यासाठी आपलं करियर पणाला लावण्याची, किंमत मोजायची त्याची तयारी आहे का ?
२) उपलब्ध परिस्थिती आणि व्यवस्थेत सहकाऱ्यांना तो महत्वाची पदं, सत्तेत सहभाग देतो का ?

ह्या दोन महत्त्वाच्या कसोट्यावर आपण व्यक्तीला पारखून घेतलं पाहिजे, असं मला स्वतःला वाटते.

आपण उदाहरणासाठी विधानसभा, लोकसभा ह्या तिकिटांचा विचार करू. म्हणजे राज्य पातळीवरील नेत्यांचा हिशेब, आकलन करणं सोपं जाईल.

विधानसभा, लोकसभेची किती तिकिटं खडसे, भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांच्या कोट्यात येत असतील, आली असतील ? बाळासाहेब ठाकरे हे तर निर्विवाद नेते होते. पण आजचा आपला लेखाचा विषय वेगळा आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन नक्कीच मोठे नेते होते. त्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना तिकिटं दिली तशीच इतरही बऱ्याच लोकांना तिकिटं दिली, राजकीय करियर घडवलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब आंबेडकर, फार काय राज ठाकरे हे सुद्धा त्या अर्थानं नेते आहेत, हे मान्य करावं लागेल. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पक्षाच्या किंवा संघाच्या आशीर्वादानं का होईना, पण इतरांना खासदार, आमदार, मंत्री बनवू शकतात, या बाबतीत वाद नाही.

छगन भुजबळ यांच्या सोबत सेना सोडून गेलेल्या १२/१३ आमदार लोकामधून एकमेव डॉक्टर राजेंद्र गोडे हे उपमंत्री होते. पण पुढील निवडणुकीत भुजबळ किती आमदारांना पुन्हा विधानसभा तिकीट मिळवून देवू शकले ? त्याचवेळी स्वतःसोबत मुलगा, पुतण्या यांना आमदारकी खासदारकी मात्र पुन्हा पुन्हा मिळवत राहिले. तीच अवस्था नारायण राणे यांची. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी राजीनामे दिले होते. पोटनिवडणुका झाल्या, त्यांनीच खाली केलेल्या जागेवर पुन्हा त्यांना तिकीट मिळणं स्वाभाविक होतं. पण नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत राणेंनी किती समर्थक आमदारांना तिकीट मिळवून दिलं ? किती आमदारांना मंत्रिपद मिळावं अशी निदान मागणी तरी केली ? स्वतःसाठी मात्र मुख्यमंत्री पद हवं, हाच त्यांचा पर्मनंट विषय होता.

म्हणूनच सुरुवातीला प्रचंड झंझावात निर्माण करणारे राणे किंवा भुजबळ हे नंतरच्या काळात स्वतः किंवा कुटुंब येवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. मंत्री असतीलही, पण नेते मात्र नाहीत. म्हणूनच जेव्हा आपण ओबीसी नेत्यांचा विचार करतो, तेव्हा भुजबळ, खडसे, बावनकुळे हे खरंच नेते ठरू शकतात का ? संधी आणि परिस्थिती पोषक असूनही ज्या लोकांनी कुटुंबाच्या पलिकडे फारसं पाहिलं नाही, समाज किंवा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी कधी भांडले नाहीत, त्यांना नेते कोणत्या आधारावर म्हणायचं ?

तरीही स्वतःची दुकानदारी चालावी म्हणून कुणी अशा लोकांच्या एकतर्फी प्रेमात पडत असतील.. त्यांच्या गळ्यात हार घालणं, फोटो काढणं, ह्यालाच सामाजिक चळवळ म्हणत असतील, त्यातच धन्यता मानत असतील, तर त्यात भुजबळ, खडसे, वडेट्टीवार, पटोले, पंकजा मुंडे, बावनकुळे यांना आपण दोष देखील देवू शकत नाही. तोही त्यांच्यावर अन्याय होईल ! कुणी स्वार्थासाठी त्यांचा फुकटात उदोउदो करत असतील, तर ते स्वतः तरी कशाला नको म्हणतील ? ते काही तुमच्या गळ्यात पडायला आले नाहीत. तुम्हीच जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात पडता, त्यांच्या फोटोंसमोर आरत्या गाता..! सत्ता गेली की लगेच गायब देखील होता आणि हे तुमच्या त्या तथाकथित नेत्यांना देखील माहीत आहे !

सारा समाज ऐश्वर्या राय वर एकतर्फी प्रेम करत असेल, तर तिला वाईट वाटण्याचं काय कारण ? आनंदच होईल ना ! तिचं स्वतःचं प्रेम मात्र अभिषेक बच्चनवर आहे. तिच्या नावासमोर त्याचंच नाव आहे, त्याचंच मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे. आणि हे सारं जगजाहीर आहे. तिचा अजेंडा स्पष्ट आहे. ठरलेला आहे. ती तिच्या संसारात खुश आहे. तरीही तुम्ही तिचे फोटो पहात पहात झुरून मरणार असाल, तर त्यासाठी ऐश्वर्या राय थोडीच जबाबदार आहे ? तीही जबाबदार नाही, अभिषेक बच्चनही जबाबदार नाही आणि अमिताभ बच्चन तर नाहीच नाही !

राजकारण असो की धर्मकारण.. ओबीसींना कुठंही स्थान नाही. तुम्ही धर्म धर्म करता.. नेता नेता..पार्टी पार्टी करता, पण ते तुम्हाला, समाजाला काहीही किंमत देत नाहीत. तुमचे प्रश्न त्यांच्या अजेंड्यावर नाहीतच ! अन्यथा तुमची जातनिहाय जनगणना कचऱ्याच्या पेटीत गेली नसती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. तुमच्या आंदोलनात किंवा कृषी कायद्यांच्या संदर्भात या लोकांनी दुटप्पी भूमिका घेतली नसती. फार काय, इम्पिरिकल डाटा गोळा करण्यात देखील हे उदासीन राहिले नसते. पर्यायानं तुमचं राजकीय आरक्षण देखील गेलं नसतं !

तरीही तुम्ही त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करत राहणार का ? अजूनही नशा उतरली नाही का ?

तात्पर्य, ओबीसी समाजानं तथाकथित नेत्यावरील एकतर्फी प्रेम सोडून शुद्धीवर यावं आणि आपल्या स्वतंत्र संसाराच्या उभारणीला लागावं, ह्यातच शहाणपणा आहे. ह्यातच त्यांचं भलं आहे !

बघा.. विचार करा.. शहाणे व्हा.. कृती करा.. स्वतंत्र व्हा !

तुम्हे खिलौनों से प्यार था..
हम आसमां की बात करते रहे !

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
9822278988

हे देखील वाचा :

फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार ! – ज्ञानेश वाकुडकर

मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

गांधी, आंबेडकर देता का कुणी ?

Comments are closed.