जालन्यात बनावट लग्न लावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस चंदनझिरा पोलिसांनी केले जेरबंद
- तीन जिल्ह्यातून तीन नवऱ्यांना शिताफीने घेतले ताब्यात
- तीन खोट्या नवऱ्यांसह एक टोळी प्रमुख महिला आणि एक आरोपी असे एकूण पाच आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. १९ जानेवारी: गुजरात येथील पियुष वसंत यांनी पोलिस ठाणे चंदनझीरा येथे तक्रार दिली की त्यांच्या मित्रांना लग्नासाठी मुली भेटत नसल्याने शोध घेतला असता जालना मधील एका एजंट ने जालना मध्ये तुम्हाला लग्नासाठी मुली भेटतील असे सांगितले त्या अनुषंगाने तीन मित्रांना घेऊन ते जालना येथे आले होते, त्यानंतर त्यांना तीन मुली दाखवून तिन्ही मुली पसंत आल्यावर एका वकीलासमोर बॉण्ड वर लग्न लावण्यात आले आणि लग्न लावून झाल्यावर परत ते त्यांच्या घराकडे म्हणजे गुजरात कडे निघाले असता नागेवाडी टोल नाका येथून जात असतांना या तिघींनी आम्हाला बाथरूमला जायचे आहे असे सांगत खाली उतरल्या आणि उतरल्यानंतर महागडे मोबाईल, कपड्यांची बॅॅग, रोख रक्कम घेऊन पळ काढला होता या सर्वांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे चंदनझिरा येथे जाऊन तक्रार दिली होती, त्याअनुषंगाने पोलिस तपास करीत असतांना पथकास यश मिळाले.
सदर गुन्ह्याची माहिती काढत असतांना जालना जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा बनावट लग्न करणाऱ्या महिलांचा शोध घेत असताना बनावट नवरी बनलेल्या महिलेस जुना जालना भागातील शनी मंदिर येथून ताब्यात घेतले असता तिने इतर महिलांचे नावे आणि राहण्याचे ठिकाण सांगितले तेव्हा औरंगाबाद, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातून इतर महिलांना ताब्यात घेण्यात आले. नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल मस्के राहणार नागेवाडी यास नागेवाडी टोल नाका येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून फिर्यादीच्या 3 महागडे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले 2 असे एकूण 5 मोबाईल, बॅग व रोख रक्कम व वापरलेली क्रूझर गाडी क्र. MH 13 BN 2426 असा एकूण 4 लाख 60 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,पोलीस कर्मचारी , अनिल काळे, विजय साळवे व महिला नाईक रेखा वाघमारे यांनी केली आहे.
Comments are closed.