महिला डॉक्टरची आत्महत्या; डॉक्टर पती, सासरवर गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. २३ डिसेंबर : डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर निवासी रुचिता मंगेश रेवतकर (३०) असे आहे. पोलिसांनी रुचिताची आई पांढुर्णा निवासी अलका सुरेश कवडे (५३) यांच्या तक्रारीवरून मृत महिलेचा पती मंगेश पुरुषोत्तम रेवतकर (३७) आणि सासू सुनंदा यांचेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
रुचिता बीएएमएस, एमपीएच डॉक्टर म्हणून नरखेडच्या रुग्णालयात कार्यरत होती. तिचे मंगेशशी एप्रिल २०१६ मध्ये लग्न झाले. मंगेश वर्धा येथे डीटीओ पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर त्याने रुचिताला नरखेडमध्ये सोडले आणि स्वता वर्धा येथे राहू लागला. काही दिवसानंतर कुटुंबीयांच्या दबावात तो रुचिताला वर्धा येथे घेऊन गेला.
रुचिताने एचपीएम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मंगेशने शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत करण्यास नकार दिला. आई-वडिलांकडून पैसे घेऊनच तिने आपले शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान तिला मिहान नावाचा मुलगा झाला. रुचिता स्वतः नोकरी करून आपले घर चालवत होती. मंगेश मदत न करता तिला मारहाण करायचा. रेडिओलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी मंगेशने रुचिताला नागपुरात आणले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने रुचिताला माहेरुन ५० लाख रुपये आणण्यास सांगितले. रुचिताचे वडील आधीच कर्करोगग्रस्त होते. घरची आर्थिक स्थिती बिकट होती. अशातही मंगेश सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी पैसे मागत होता. दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी पती-पत्नीत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मंगेश आलाच नाही.
Comments are closed.