नागपुरातील सट्टेबाजांचा गोंदियात अड्डा!
- बिग बॅश टी20 क्रिकेट स्पर्धेवर जुगार खेळणारे चौघांना अटक
- 1.63 लाखाचा मुद्येमाल जप्त
गोंदिया, 25 डिसेंबर: आस्ट्रेलिया येथील बिग बॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यावर गोंदिया येथील कृष्णपुरा वॉर्डात आभासी पद्धतीने सुरु असलेल्या जुगार अड्डयावर 23 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी धाड टाकली. दरम्यान, पोलिसांनी जुगार खेळविणार्या नागपूर येथील चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.
इंडियन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता ऑस्ट्रलिया व अन्य देशातील आयोजित केल्या जाणार्या टी20 क्रिकेट स्पर्धेवर खेळल्या जाणार्या जुगाराकडे जुगार खेळणारे वळू लागले आहेत. गत काही वर्षात भारतात खेळल्या जाणार्या टी20 क्रिकेट स्पर्धेवर जुगार अड्डे चालविणार्यांवर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. यावर्षी देखील टी20 स्पर्धेदरम्यान काही जुगार अड्डयांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही क्रिकेट स्पर्धेवर जुगार खेळविणार्या व खेळणार्यांवर आळा बसलेला नाही. इंडियन प्रिमीयर लिग क्रिकेट स्पर्धेनंतर आता गोंदिया शहरात ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश टी20 क्रिकेट स्पर्धेवर जुगार खेळला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी कृष्णपुरा वॉर्डातील कचरा मोहल्ला येथील विकास भालाधरे यांच्या घरावर धाड टाकली.
यावेळी तेथे ब्रसबेन विरुद्ध ऐडीलेट स्ट्रायकर संघामध्ये सुरु असलेल्या सामन्यावर क्रिकेट माझा-11 या अॅपद्वारे जुगार खेळविला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळीच आरोपी कपील जुडियानी (33, कवडी चौक, नागपूर), जयकुमार मेघरानी (26, खामला), अजय चांदवानी (23, जरीपटका) व गोयल दिपानी (21 रा.गणेश मंदिर चौक, नागपूर) यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याजवळून 15 मोबाईल, 4 लॅपटॉप, एक टीव्ही संच व अन्य साहित्य असा 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला. आरोपींवर शहर पोलिस ठाण्यात भादंवि 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार महेश बंसोडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय राणे, पोलिस कर्मचारी संतोष सपाटे, जागेश्वर उईके, ओमेश्वर मेश्राम, सुबोधकमार बिसेन, योगेश बिसेन, प्रमोद चव्हाण, सतीश शेंडे, दीपक रहांगडाले, छगन विठ्ठले, विनोद शहारे, विजय मानकर यांनी केली.
Comments are closed.