गडचिरोलीत अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचा साठा जप्त; एक अटकेत, तेलंगणातील आरोपीचा शोध सुरू
अहेरी तालुक्यात अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले असून, यामुळे प्रशासनाची कारवाई सक्षम व परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी दि. 19 मे : तालुक्यातील बियाणे विक्रीच्या नियमनाच्या कायद्यांचे उल्लंघन करणारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहेरी पोलिसांनी मुक्तापूर गावात धाड टाकून सुमारे 1 लाख 20 हजार किमतीचे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त केले असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार असून तो तेलंगणा राज्यातील असल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्याची नोंद व कायदेशीर धारांखाली कारवाई..
दि. 19 मे 2025 रोजी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 135/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223, 318(4), 3(5) तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983, बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे विनियमन अधिनियम 2009 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत मुख्य फिर्यादी म्हणून भगवान शिवाजी गावडे (26), कृषी अधिकारी, पंचायत समिती अहेरी यांनी तक्रार दाखल केली आहे.
संशयित व जप्त मुद्देमाल..
गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव कारु मुत्ता सिडाम ( 59, रा. मुत्तापूर, ता. अहेरी) असून, त्याच्याकडून SLS CLASSIC PREMIUM SONA RICE असे छाप असलेल्या 10 किलो क्षमतेच्या गुलाबी व शेंदरी रंगाच्या सहा पिशव्यांमध्ये साठवलेले सुमारे 60 किलो प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे पोलिसांनी जप्त केले. या बियाण्यांची अंदाजे विक्री किंमत प्रति किलो 2002 रुपये असल्याने एकूण मुद्देमालाची किंमत 1,20,120 रुपये इतकी आहे.
दुसरा संशयित आरोपी आप्पाराय सांबय्या काटेबोईना ( 60, रा. तेलंगणा राज्य) हा बिबियाणे पुरवठा करणारा सूत्रधार असून, त्याचा शोध सुरु आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई..
दि. 18 मे रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक स्वप्निल इजपवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अतुल अरुण तराळे, महिला पोलीस अंमलदार वंदना डोनारकर यांनी ही धाड टाकली आहे. दोन पंचांच्या समक्ष घराची पाहणी करण्यात आली असता, बैठकीच्या खोलीतील पलंगाजवळ हे बियाणे साठवलेले आढळून आले.
कायदेशीरदृष्ट्या गंभीर गुन्हा..
HTBT (Herbicide Tolerant Bt) कापूस बियाण्यांवर भारतात सध्या प्रतिबंध आहे, कारण हे बियाणे जीएम (जनुकांतरीत) प्रकारातील असून ते केंद्रीय बियाणे समितीच्या परवानगीशिवाय विक्रीस अपात्र ठरतात. या बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला घातक ठरू शकतो, शिवाय अधिक उत्पादनाच्या आमिषाने शेतकरी फसवले जातात.
तपास सुरु, साखळी उघडकीस येण्याची शक्यता…
या प्रकरणातील आरोपी हे तेलंगणा राज्याशी संबंधित असल्यामुळे हे बियाणे राज्यांतरित मार्गे पुरवले जात असल्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांच्या मते, पुढील तपासात अशा प्रकारच्या अनधिकृत बियाण्यांची साखळी उघड होण्याची दाट शक्यता आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासी व सीमावर्ती भागात अशा प्रतिबंधित बियाण्यांची विक्री हा गंभीर प्रश्न असून, शासनाने याबाबत कठोर कारवाईची गरज आहे, अशी मागणी कृषी क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे एकाच दिवशी पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांनी दोन मोठ्या कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवरल्याने अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले असून, यामुळे प्रशासनाची कारवाई सक्षम व परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
Comments are closed.