Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिओ स्टुडिओजने वैविध्यपूर्ण शैलीतील चित्रपट आणि वेबसिरिजमधून प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

मराठी मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जिओ स्टुडिओज सज्ज झालं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 08 सप्टेंबर :- जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेला “मी वसंतराव” या संगीतप्रधान चित्रपटाने सिनेमागृहात शंभर दिवसांचा टप्पा गाठला. याबरोबरच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (राहुल देशपांडे) आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी साउंड डिझायनर (अनमोल भावे) असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांबरोबच या चित्रपटाचे अनेक स्तरातून कौतुक झाले.

आणि आता पुढील टप्पा म्हणजे येणाऱ्या काळात जिओ स्टुडिओज मराठी दिग्गज कलाकारांच्या समवेत चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करणार आहे. यात महेश मांजरेकर, प्रशांत दामले, सुकन्या कुलकर्णी, सयाजी शिंदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, भाऊ कदम, केदार शिंदे, अंकुश चौधरी, राहुल देशपांडे, हृता दुर्गुळे, अश्या मराठीतील अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महत्वाचं म्हणजे यात वैविध्यपूर्ण प्रकारच्या शैलीतील प्रोजेक्ट्स असणार आहेत, अगदी कॉमेडीपासून ते थ्रिलर्सपर्यंत, सत्य घटनांवर आधारित गोष्टींपासून ते प्रेमकथांपर्यंत, ज्या सर्व मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

यातील आगामी प्रोजेक्ट म्हणजे अभिनेता भाऊ कदम आणि भूषण पाटील अभिनीत ‘घे डबल’ हा धमाकेदार कॉमेडी चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित या चित्रपटात भाऊ कदम पहिल्यांदाच दुहेरी भूमिका असणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर सध्या चर्चेत असलेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘गोदावरी’ हा ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, या चित्रपटाची निर्मिती ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी केली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

२०२३ या नववर्षाची सुरुवात दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खुमासदार शैलीने नटलेला “बाईपण भारी देवा” या चित्रपटाने होणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले निर्मित हा चित्रपट नववर्षात ६ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अशा उत्तमोत्तम कलाकारांची धमाल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

चित्रपटासह जिओ स्टुडिओज मराठी डिजिटल विश्वातही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झालं आहे. ‘एका काळेचे मणी’ ही एक धमाल वेबसिरीज जिओ स्टुडिओज घेऊन येत असून, एका चित्र-विचित्र पात्रांची आणि परिवाराची आगळीवेगळी कथा असणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून या वेबसिरीजचे दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केले आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील सुपरस्टार अभिनेते प्रशांत दामले मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यांच्याबरोबर हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे, कॉमेडीस्टार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार देखील यात असणार आहेत.

या वेब सिरीज संदर्भात निर्माते महेश मांजरेकर म्हणतात, “सध्याच्या पिढीतील युवकांच्या आवडीनिवडी या वेगळ्या असतात आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात विरोधाभास आणि धमाल निर्माण होते आणि याच नव्या विचारांची गंमत जंमत या मालिकेत दिसणार आहे, मुख्य म्हणजे आम्हाला जिओ स्टुडिओज सारखा एक उत्तम पार्टनर भेटला आहे.”

“एका काळेचे मणी” नंतर सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या थरारक ॲक्शन पॅक वेब सिरीजचं दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले असून, जिओ स्टुडिओजसह मंजिरी सुबोध भावे यांच्या नेतृत्वाखालील कान्हा निर्मिती संस्थेने या वेब-शोची निर्मिती केली आहे. यात सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, सयाजी शिंदे, अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची जबरदस्त स्टारकास्ट झळकणार आहे.

या वेबसिरीजसंदर्भात सुबोध भावे म्हणाले, “ही कादंबरी जेव्हा मी वाचली तेव्हापासूनच ही कथा मला प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची होती आणि आनंदाची गोष्टी म्हणजे ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी जिओ स्टुडिओ पूर्णपणे आमच्या पाठीशी उभं राहिलं आहे.”

आणि याच सिरीज मधील महत्वाचं वेबसीरिज म्हणजे ‘जक्कल!’ १९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शो असून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गुन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे. दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेल्या चार वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकल्पांसंदर्भात बोलताना जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंटचे प्रमुख निखिल साने म्हणाले, “अल्पावधीतच जिओ स्टुडिओजने अनेक विविध ढंगाचे प्रोजेक्ट्स तयार केले आहेत. आणि आता ते प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहेत. मराठीतील सर्वोत्तम अश्या प्रतिभावान कलाकारांसोबत आम्ही याची निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या कथा आणि त्यांची उत्तम मांडणी पाहता, या दर्जात्मक कलाकृती प्रेक्षकांचं मनोरंजन करतील याची आम्हांला खात्री आहे. आणि याचबरोबर येणाऱ्या काळात अजून नवनवीन प्रोजेक्ट्स तयार करण्याचा आणि मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा मानस आहे.

हे देखील वाचा :-

नरभक्षी वाघाने घेतला पुन्हा एक बळी ; उसेगाव परिक्षेत्रातील घटना

 

Comments are closed.