Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बंद कुलरमधील पाणी काढा डेग्यू आजारापासून बचाव करा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 10 ऑगस्ट :-  पावसाळयाचे दिवसांमध्ये विविध प्रकारचे किटकजन्य आजार उध्दभवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करत नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारावर वेळीच प्रतिबंध पालने शक्य आहे. त्यामुळे नागरीकांनी सहग राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाळा सुरु झाला म्हणजे डासांची उत्पती वाढते. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप या सारखे आजार सुरु होतो मात्र बहुतांशी डासांची उत्पतीस्थाने हि आपल्या घरांच्या परिसरात किंवा घरातही असतात. घरातील फ्रीज, कुलर आणि फुलदानीत पाणी साचून असलेतरी याकाळात डास होतात.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षीत ७० तर या वर्षात जूलै पर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. पावसाळयात डेग्यूचे रुग्ण वाढत असतात डेंग्यू हा एडिस इजिप्टाय या दुषित डासाच्या मादीने चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावतो व स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोके दुखी, स्नायूदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भुक मंदावणे, जास्त तहाण लागणे, तोंडाला कोरडे पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव, रक्त मिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे त्याचबरोबर प्लेटलट कमी होण्याचे प्रकार देखील वाढतात. त्यामुळे अशक्तपणा वाढत जातो. इत्यादी डेंग्यूची लक्षणे आहेत. ही लक्षणे असल्यास त्वरीत उपचार होणे आवश्यक आहे. किटकजन्य आजारामध्ये हत्तीरोग, हिवताप, जेई, डेंग्यू, चिकुण गुणिया, चंडिपुरिया या सारख्या आजाराचा समावेश आहे. यापैकी हिवतापाचा प्रसार ऍनाफिलीस जातीच्या मादी डासा मार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबके, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या इत्यादी. मध्ये होते. डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात तेथे वाढ होवून असा दुषित डास निरोगी मनुष्यास चावल्यास तेथे त्यांची वाढ होवून १० ते १२ दिवसाने मनुष्याला थंडी वाजून ताप येतो. अशा प्रकारे डासाव्दारे हिवतापाचा प्रसार होतो.

आजार होवू नये म्हणुन नागरिकांनी खालील उपाययोजना कराव्यात.
जिथे पाणी साचलेले किंवा साठविलेले असते तिथे मच्छराचा वास असतो. परिसर अस्वरच्छता, केरकचऱ्याचे ढिगारे, शेणखताचे खड्डे हयात सुध्दा किटकाची उत्पती होत असते. डास हे साचलेल्या व साठविलेल्या पाण्यात तसेच अस्वच्छता हया ठिकाणी अंडी घालतात. अंडयाचे रुपांतर अळीत होऊन त्यापासून विकसीत डास तयार होतो. तुम्ही डासांच्या निर्मितीस साध्या उपायांनी स्वःतच आपल्या गावात, आपले घरी आळा घालु शकता. पर्यायाने आजारावर नियंत्रण ठेवण्यात व प्रसार थांबविणे शक्य होईल. साचलेले पाणी वाहते करा, पाण्याचा निचरा होण्यासाठी शोषखड्डयाचा वापर करा, घरातील सभोवतालची डासाची उत्पती स्थाने नष्ट करा व परिसर स्वच्छ ठेवा, साचलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा वंगणाचे थेंब टाका, पाण्याचे साठे झाकुन ठेवा, घरातील साठविलेल्या पाण्यात चुनचुन्या, चिल्लुके, चांडक, हेंडवे, इत्यादी अळया दिसून येताच पाण्याचे साठे धुऊन, पुसून खरचडून कोरडे करा, आठवडयातून एकदा ठराविक दिवशी गावातील सर्व कुटूंबांनी कोरडा दिवस पाळावा. शरीर झाकेल असे कपडे घाला व उघडयावर झोपू नका, निरुपयोगी विहिरीत व साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पीमासे टाका. सायंकाळच्या वेळेस घरातील दारे खिडक्या बंद ठेवा व गोठयात पालापाचोळयाचा धुर करा, डुकरांना गावापासून दूर ठेवा, घरातील भिंतीच्या अडगडी, भिंतीच्या भेगा बुजवा, दररोज किटकनाशक भारीत मच्छरदानीचा वापर करा, पावसाळ्यात फवारणीच्या वेळेस घरातील सर्व खोल्या देवघर व स्वयंपाक घर सुध्दा पुर्णत आतील भाग फवारून घ्यावा, मुलांना भिंतीपासून दूर खाटेवर झोपवा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शनिवारी पाळा कोरडा दिन :- किटकजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी आठवडयातून शनिवार हा एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवसी पाण्याची टाकी, रांजन, माठ, वॉटर कुलर, रिकामे करून स्वच्छ पूसून घ्यावे. छतावरील खड्डे, टायर, भंगार वस्तू, नारळाच्या करवंटया, रिकाम्या कुंडयाखालची पेट्रीडीश, बादल्या, फ्रीजमधील ट्रे, निरुपयोगी माठ, भांडयात पाणी साचू देवू नये. कुलर, फुलदान्या, झाडाच्या कुंडया, प्राण्यांचे पाणी पिण्याचे भांडे यातील पाणी बदलत रहावे. वापरण्याच्या पाण्याची भांडी झाकुन ठेवावी अथवा भांडयाचे तोंड कापडाने घट बांधावे. कुलरमध्ये पाण्याच्या टाकीत गप्पी मासे सोडावे कुलरमध्ये डास अळी तयार होणार नाही याची दक्षता घ्यावी. मच्छर अगरबत्ती, मच्छरदानीचा वापर करावा. संपूर्ण शरीर झाकेल असे सैल कपडे वापरावे. घरच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये. गवतजन्य वनस्पतीचा नायनाट करावा. डास होवू नये म्हणुन डास अळीची पैदास रोखण्यात यावी. गप्पी मासे घरोघरी कुलरच्या पाण्यामध्ये सोडण्यात यावे.

प्रत्येकाचा लोकसहभाग महत्वाचा :- डेंग्यूसह किटकजन्य आजार होवू नये यासाठी प्रत्येकाचा लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभागानेच डेंग्यूसारख्या आजारापासून आपण मुक्ती मिळवू शकू. असे जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. कुणाल मोडक यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

किशोरी संजिवनी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात चार तालुक्यात राबविणार – कुमार आशीर्वाद

Comments are closed.