Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

रुग्णालयाच्या बाहेरून रुग्णांना आणावे लागते पाणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कोरची, दि. ३० सप्टेंबर: रुग्णांना सोय व्हावी व तालुक्याच्या ठिकाणी रोग्यांचे निदान व्हावे याकरीता कोरची येथे भव्य ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु मागील काही वर्षापासून ग्रामीण रुग्णालय हे भोंगळ कारभारामुळे चर्चेत राहत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यापासून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे पाण्याची समस्या उद्भवली असून रुग्णांना शौच व आंघोळीकरीता स्वतः पायपीट करून रुग्णालयाच्या बाहेरून पाणी आणावे लागत असल्याचे दिसून येत आहे. गरोदर महिलांना सुद्धा यामुळे त्रास होत असल्याचे रुग्णांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पाण्याअभावी रुग्णालयाच्या शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे सुद्धा रुग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही कोरोना या आजाराची भीती नागरिकांच्या मनात असून तिसरी लाट येऊ नये याकरिता प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. परंतु ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रुग्णांचे हाल होत असल्यामुळे संबंधित विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून जागोजागी पाणी साचून राहत असल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहेत व रुग्णालयाच्या खिडकीचे काच फुटले असून रुग्णांकरिता मच्छरदानी नसल्यामुळे त्यांना डासांमुळे रुग्णालयात रात्र काढणे खूप अवघड जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यात मलेरियाचे रुग्ण सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण रुग्णालय कोरची करिता सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे कित्येकदा पत्रव्यवहार करूनही अजून पर्यंत पाण्याचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले नसल्यामुळे रुग्णांना गैरसोय होत आहे.

डॉ. बागराज धुर्वे – वैद्यकीय अधीक्षक,

ग्रामीण रुग्णालय, कोरची

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.