चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केलेल्या परिपत्रकाविरोधात गडचिरोली जिल्ह्यात शाळा बंद आंदोलनास १०० टक्के प्रतिसाद
११ डिसेंबर २०२० चे परिपत्रक रद्द करण्याची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ डिसेंबर: शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता, पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केलेल्या ११ डिसेंबर २०२० च्या अन्यायकारक आदेशाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या आवाहनानुसार गडचिरोली जिल्हा शिक्षण संस्था संचालन मंडळ व अन्य शैक्षणिक संघटनाच्यावतीने आज १८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनास जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील १०० टक्के शाळामधील मुख्याध्यापकांनी आपली शाळा बंद ठेवत असल्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठविला आहे.
शासनाने मागणी मान्य न केल्यास ४ जानेवारी पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. या बंदला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्ह्शाखेत्री, सचिव जयंत येलमुले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सचिव अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष संतोष सुरावार, सचिव गोपाल मुनघाटे, विजुक्टाचे धमेंद्र मुनघाटे, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे प्रा. शेषराव येलेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश चडूगलवार, सचिव संजय मल्लेलवार, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनीष शेटे, सचिव श्रीपाद वठे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतीश पवार यांच्यासह विविध संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.
Comments are closed.