Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिकमध्ये विटभट्टी मालकाकडून आदिवासी मजुराला बेदम मारहाण, हात-पाय बांधून केले अपहरण.. आरोपी मालक गजाआड

“समाजातील वेठबिगारीची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी शासनाने वेठबिगारी विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी”.- विवेक पंडित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिक दि.23 नोव्हेंबर : राज्यात मोठ्या प्रमाणात विटभट्टी मालक, दगड खाणी मालक, द्राक्ष बागायतदार, ऊस उत्पादक व तत्सम मालकवर्गाकडून वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात अडकले आहेत. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या डहाळेवाडी येथे प्रकाश गोडे या मजुराला वीट भट्टी मालकाने बेदम मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून त्याला चारचाकी गाडीतुन पळवुन नेल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपी विटभट्टी मालकाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १ दिवसांची पोलिस कोठडीत रवानगी करून आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी सुनीता प्रकाश गोडे या पीडित मजुराच्या पत्नीने मालक अमोल भोसले व दोन अज्ञातांविरोधात तिच्या पतीचे अपहरण केल्याची घोटी पोलीस ठाण्यात फीर्याद दिली आहे. या फीर्यादीत म्हटले आहे की, “विटभट्टीवर काम करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर तालुक्यातील शिरगाव येथील वीटभट्टी मालक अमोल भोसले यांच्याकडुन मी विटभट्टीवर विटा वाहण्यासाठी १२ हजार व माझा पती प्रकाश गोडे विटा थापण्यासाठी यांनी २० हजार रुपये उचल (बयाना) घेतली होती. सदरची रक्कम विटभट्टीवर काम करून फेडण्याचे ठरले होते. त्यासाठी दिवाळी सणानंतर कामावर जायचे ठरले होते. परंतु दिवाळीनंतर अमोल भोसले यांचे विटभट्टीवर जाण्यासाठी चार दिवस उशीर झाला. दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमोल भोसले व त्यांच्या दोन साथीदारांनी डहाळेवाडी येथील फीर्यादीच्या घरात घुसुन प्रकाश गोडे यांना मारहाण करीत हात-पाय बांधून त्यांना चारचाकी वाहनातुन जबरदस्तीने घेऊन गेले” असे तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अमोल भोसले व त्याच्या दोन साथीदार विरोधात भादवि कलम ३६३, ४५२, ३७४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विटभट्टी मालक वेठबिगारी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने वर्षभरात पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील २६ वेठबिगारांना मुक्त केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री विवेक पंडित यांनी “समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासाठी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच, मुक्त करण्यात आलेल्या वेठबिगारांना ‘तात्काळ सहाय्य’ आणि ‘दीर्घकालीन पुनर्वसन’ करण्यासाठी राज्य सरकारच्या मदत आणि विशेष साहाय्य विभागामार्फत जिल्हाधिकारी यांना मदतीचा निधी आणि आदेश द्यावेत” अशी मागणी केली आहे.

सदर घटनेचा अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे करत आहे. दरम्यान आरोपी अमोल भोसले याला अटक करण्यात आली असून, काल दिनांक २२ रोजी न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती व आज पुन्हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Comments are closed.