नागपुर मनपा च्या २९ शाळा/कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १९ नोव्हेंबर: नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सोमवार २३ नोव्हेंबर पासुन पुन: सुरु होत आहे. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतची शाळा / कॉलेज सुरु करण्याचे निर्देश निर्गमित केले होते. तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. तसेच अति. आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी दि.१२.११.२०२० रोजी झूम मीटिंगच्या माध्यमातून माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांची सभा घेऊन त्यांना शाळा सुरु करण्यासंबंधी आवश्यक निर्देश दिले. मनपाचे २५ माध्यमिक व चार कनिष्ठ महाविद्यालयांचे जवळपास ३७५४ विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय शिकवीले जातील.
राज्य शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्याचे सांगितले आहे. आतापर्यंत ६० टक्के शिक्षकांनी चाचणी केली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या २० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शाळांकडे उपलब्ध निधीतून थर्मामीटर, थर्मल गन, पल्स आक्सीमीटर, जंतुनाशक साबण इत्यादी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक शाळा ४ तास चालवावी असे नियोजन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या बैठका २० नोव्हेंबर पर्यंत सर्व शाळेमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे काम सुरु झाले आहे.
मनपाच्या झोनस्तरावरुन सर्व २९ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व शाळा निरीक्षकांना त्यांच्या झोन मधील माध्यमिक शाळांची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडून केलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात येत आहे.
मनपाचा शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शाळेत चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्याची जसे मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करु नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. संशयीत कोविड-१९ रुग्ण शाळेत आढळल्यास त्याला इतरांपासून वेगळे ठेवावे व त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारिरिक अंतराचा नियमानुसार करण्याचे आदेश दिले आहेत. पालकांना सुध्दा विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तीक वाहनाने शाळेत सोडण्याचे सांगितले आहे. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही तसेच रोज निर्जंतुक करण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
Comments are closed.