गडचिरोलीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उल्लेखनीय कामगिरीसाठी ४० पोलिसांचा सत्कार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आज महाराष्ट्र दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या हस्ते सकाळी ६.४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेषतः, १ मे २०१९ रोजी जांभुळखेडा–कुरखेडा मार्गावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांची आठवण उपस्थित अधिकारी, अंमलदार आणि शहीद कुटुंबीयांनी घेतली.
पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी यंदा गडचिरोली पोलीस दलातील १३८ अधिकारी व अंमलदारांची निवड झाली असून, त्यातील ४० जणांना आज प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश हेही उपस्थित होते.
प्रभारी पोलीस अधीक्षक देशमुख यांनी आपल्या भाषणात पोलीस दलाच्या वर्षभरातील कार्याचे कौतुक करत सर्व अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी शहीद कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यानंतर पोलीस मुख्यालयात सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्रभारी पोलीस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक रमेश व अन्य चार अधिकारी-अंमलदारांना सहपालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस दलाकडून पथसंचलन सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments are closed.