रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात भेट देत दिला आधार
वन्यजीव हल्ल्यांबाबत तात्काळ मदतीचा निर्णय देणारी यंत्रणा प्रभावीपणे राबवा – जयस्वाल यांचा प्रशासनाला निर्देश..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी ५५ वर्षांची इंदिराबाई सहारे यांच्यावर काही दिवसांपूर्वी जंगलात काम करत असताना एका रानटी हत्तीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेची दखल घेत राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन इंदिराबाई यांची तब्येत जाणून घेतली. त्यांनी आस्थेने त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला. या वेळी वनविभागाच्या वतीने नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा तात्काळ धनादेश इंदिराबाई सहारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी यावेळी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, रुग्णाच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये. सरकारी रुग्णालयात सर्व आवश्यक वैद्यकीय सेवा तत्काळ आणि मोफत उपलब्ध करून द्याव्यात.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ – गरज आहे ठोस उपाययोजनांची
गडचिरोली जिल्ह्यात रानटी प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये अलीकडच्या काळात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये विशेषतः हत्ती, अस्वल, बिबट्याच्या हल्ल्यांची प्रकरणं समोर येत असून ग्रामीण भागातील लोकजीवन असुरक्षित होत आहे.
या पार्श्वभूमीवर सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, वन्यप्राण्यांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवणारी प्रभावी यंत्रणा राबवली पाहिजे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाची जबाबदारी – ‘मानवी जीव सुरक्षिततेसाठी समन्वयाने काम करा’
या प्रसंगी आमदार रामदास मसराम, उपवनसंरक्षक, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासनाकडून अशा घटना टाळण्यासाठी पुढील काळात विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.
प्रशासनाने वनविभाग, ग्रामस्थ व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून उपाययोजनांचे तातडीने नियोजन करावे, तसेच जनजागृती आणि हत्ती संचार मार्गांचे मॅपिंग करून धोके कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
Comments are closed.