Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“बोगस वर्दीत बंटी-बबलीचा गनिमी ढाच! – वनअधिकाऱ्याचा मुखवटा घालून खैर तस्करीचा दरोडा”

दापोलीतील बिल्डरला ३० लाखांची खंडणी; रायगड–रत्नागिरीतील अनेक व्यापारी फसले, पोलीस आणि वनविभागाच्या भक्कम कारवाईची मागणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रत्नागिरी–रायगड : कधी वनअधिकाऱ्याची वर्दी, तर कधी कारवाईचा बहाणा… खाकी वर्दीत जंगलाच्या रक्षणाचे ढोंग करत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात खैर तस्करी करणाऱ्या एका ‘तोतया अधिकाऱ्याचा’ पर्दाफाश होण्याच्या उंबरठ्यावर आलेला आहे.

वनविभागाचे बनावट अधिकारी असल्याचे भासवत ‘बंटी-बबली’ जोडीने निधड्या छातीने व्यापाऱ्यांवर खोट्या गुन्ह्यांची टांगती तलवार ठेवत लाखो रुपयांची खंडणी वसूल केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रत्नागिरीतील मंडणगड रोडवर अबेट शेनाळे परिसरात वास्तव्यास असलेल्या विजय काते या भामट्याने, वनखात्याच्या वर्दीत फिरून अनेक वाहनांची तपासणी केली, दस्तऐवज मागवले, आणि खोट्या कारवायांच्या नावाखाली पैसे उकळले.

त्याच्या जोडीदार ‘बबली’ हिचं वास्तव्य ठाणे–कल्याण परिसरात असून, तीही या टोळीचा सक्रिय भाग असल्याचे समजते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भासवली ‘खाकी’, उचलले लाखो!…

वनअधिकाऱ्याचा सत्तासूचक रुबाब चढवून या बंटी-बबली जोडीने रायगड आणि रत्नागिरीतील लाकूड व्यापाऱ्यांपासून ट्रान्सपोर्टर्सपर्यंत अनेकांना गंडवले.

दापोलीतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला तर सुमारे ३० लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्यावर आधीपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत, मात्र दोघेही सध्या फरार आहेत.

‘बंटी-बबली’चे नवे अवतार – चोर, खैर तस्कर, अधिकारी आणि आता गनिमी कलाकार!…

ही जोडी वनविभागातील अधिकाऱ्यांची वेशभूषा करून बेकायदेशीर खैर वाहतुकीच्या नावावर ‘सरकारी दबाव’ टाकते. खोट्या कागदपत्रांच्या आधारे व्यापाऱ्यांना गाड्या थांबवून, “तुमच्यावर खैरचा वनगुन्हा होईल”, असा दम देत रोख रक्कम मागवतात.

या जोडीने कधी वनअधिकारी, कधी पोलिस, तर कधी पत्रकारही असल्याचे सांगून आपली प्रतिमा ‘अधिकार’ गाजवणाऱ्या यंत्रणेसारखी उभी केली. हीच त्यांची फसवणूक आणि धमकी यांची व्यावसायिक शैली बनली आहे.

पोलिसांची शोध मोहीम सुरु – नागरिकांत संतापाची लाट…

दापोली पोलीस स्टेशनने या घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.नागरिकांनी या ‘तोतया टोळी’चा लवकरात लवकर पर्दाफाश करण्याची मागणी केली असून, “आमच्यावर कारवाईचा धाक दाखवून हे टोळके पैसे उकळते, प्रशासनाने यात कसलीही भूमिका घेतलेली नाही,” अशी प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.