अमरावती जिल्ह्यातील सैनिकाचा कुलू-मनाली परिसरात आग दुर्घटनेत मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती डेस्क 24 डिसेंबर:- भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉइंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते अचलपूर तालुक्यातील पिंपळखुंटा येथील रहिवाशी होते. त्यांच्यामागे पत्नी, दीड वर्षाची मुलगी व आप्तपरिवार आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कैलास कालू दहिकर हे 27 वर्षीय जवान भारतीय सैन्यात ‘15 बिहार’मध्ये कार्यरत होते. काल दि. 23 डिसेंबरच्या रात्री हिमाचलप्रदेशातील कुलू-मनाली येथे कर्तव्यावर असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी रात्री केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. श्री. दहिकर यांच्या मृत्यूनंतर आवश्यक ते सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने आणले जाणार आहे. त्यानंतर सैन्याच्या वाहनातून पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली.
Comments are closed.