सिरोंचा बसचे ब्रेक फेल, चालकाच्या धाडसाने ८१ प्रवासी सुखरूप..
गडचिरोलीतील अहेरी आगारातील धक्कादायक प्रकार ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ मे : अहेरीहून सिरोंचाकडे जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये ८१ प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रितपणे थांबवली आणि सर्वांचे प्राण वाचवले. ही थरारक घटना आज (सोमवारी) दुपारी नंदीगावजवळ घडली.
अहेरी आगाराची एमएच ४० एक्यू ६०४२ क्रमांकाची एसटी बस दुपारी प्रवाशांना घेऊन सिरोंचाच्या दिशेने निघाली होती. ही बस आधीच दोन तास उशिराने रवाना झाली होती, त्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता होतीच. प्रवास सुरू असतानाच नंदीगावजवळ बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला. काही क्षणातच ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. याची कल्पना मिळताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, अनेकांचे काळजाचे ठोके चुकले.
मात्र चालकाने घाबरून न जाता, प्रसंगावधान राखत हळूहळू बस पुढे चालवत गुड्डीगुडम गावाजवळ ती थांबवली. त्यामुळे एक मोठा अपघात टळला. काही वेळातच परिवहन मंडळाची दुसरी बस घटनास्थळी पोहोचली आणि प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
जुनीच अवस्था, नवा धक्का..
या घटनेने पुन्हा एकदा अहेरी आगारातील बसेसच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले आहे. दोन वर्षांपूर्वी एका धावत्या एसटी बसचे छत उडाल्याची घटना गाजली होती. बसमधून पावसाचे पाणी गळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक चालक छत्री धरून बस चालवत असल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता ब्रेक फेलचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
प्रशासन गप्प का?
दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात घालून मोडकळीस आलेल्या बस रस्त्यावर धावत असल्याचा हा ठळक पुरावा आहे. एकीकडे महामंडळ आर्थिक अडचणीत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे रखडलेली देखभाल आणि नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे प्रवाशांचे प्राण संकटात येत आहेत.
“आता पुरे झाले…”
या घटनेनंतर अनेक प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. “बसमध्ये चढलो की श्वास रोखून बसावं लागतं,” असं एका प्रवाशाचं बोलणं शासनाच्या कानावर जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.