Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मान्सूनपूर्व तयारीसाठी सर्व विभागांनी ठोस कृती आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, १४ मे : आगामी पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून तातडीने पूर्वतयारी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज पार पडलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहायक जिल्हाधिकारी मानसी, कुशल जैन, नमन गोयल, रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूरप्रवण भागांमध्ये विशेष लक्ष द्यावे…

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पूरप्रवण भागांची यादी तातडीने तयार करावी. त्या ठिकाणी नागरिकांमध्ये जागृती करावी व आपत्तीच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी विभागीय समन्वय राखावा. गावपातळीवर स्थानिक तरुण, प्रशिक्षित तैराक व स्वयंसेवकांची यादी तयार ठेवावी. धान्य, औषधे व अन्य अत्यावश्यक वस्तूंचा साठा तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पायाभूत सुविधांची देखभाल आणि स्वच्छतेवर भर..

नदीनाल्यांवरील पूल, रस्ते यांची दुरुस्ती करून वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिक्रमणामुळे मार्ग अडवले जाऊ नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्पदंश व साथीच्या आजारांवर त्वरित उपचार देता येतील, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा उपलब्ध ठेवावा.

ग्रामपंचायतींनी विहिरी, हँडपंप व पाणवठ्यांची स्वच्छता करावी. सांडपाण्याचा निचरा होईल, याची दक्षता घेण्यास सांगितले. शहरांमध्ये अनधिकृत व धोकादायक फलक तातडीने हटवावेत, असे निर्देश नगर परिषदेला देण्यात आले.

वाहतूक, आरोग्य आणि महिला सुरक्षा या बाबींवर भर…

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. नदीकिनाऱ्यावरील गावांना योग्य वेळी धोक्याचा इशारा देण्यात यावा. वाहतूक संपर्क तुटणाऱ्या भागात अन्नधान्य, औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवावा. तसेच, ज्या गावांमध्ये पुढील काही महिन्यांत प्रसूती अपेक्षित आहेत, अशा महिलांची यादी तयार करून त्यांना सुरक्षित आरोग्य केंद्रात स्थलांतरित करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.

आरोग्य केंद्रात मेंदूज्वर, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांवर उपचारासाठी आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यावर त्यांनी भर दिला. पावसाळ्यात परवानगीशिवाय जलवाहतुकीस बंदी राहणार असून, पूराच्या पाण्यातून वाहन चालवण्यास मनाई असेल, हे नागरिकांना समजावून सांगण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय सादरीकरण व उपाययोजना…

या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी विभागनिहाय धोके व उपाययोजनांचे सादरीकरण केले. जलसंपदा विभागाचे उपअभियंता गणेश परदेशी यांनी जलप्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीची माहिती दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, भूसंपादन अधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.