Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंधनाची बचत करणाऱ्या विभागांचा व आगारांचा गौरव

इंडियन ऑइल कंपनीने चषक देऊन केला सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 17 फेब्रुवारी :- इंधनाच्या वाढत्या दरवाढीनंतरही एसटी महामंडळाने काटकसरीचा मार्ग स्वीकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ विभाग व २५० आगारांपैकी कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त अंतर कापून महामंडळाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करणाऱ्या राज्यातील ५ विभाग व ५ आगारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन गौरविण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. एसटी वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या दरवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात महामंडळातील ३१ विभागांपैकी भंडारा , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली व जालना या ५ विभागांनी तसेच २५० आगारांपैकी भंडारा विभागातील साकोली , तिरोडा , गोंदिया व पवनी तसेच नागपूर विभागातील वर्धमान नगर अशा एकूण ५ आगारांनी कमीत कमी इंधनामध्ये सर्वाधिक अंतर कापण्याची उल्लेखनीय कामगिरी करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यास हातभार लावलेला आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महामंडळाचे महाव्यवस्थापक (क.व औ सं .) माधव काळे , यंत्र- अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक रघुनाथ कांबळे , भांडार व खरेदी विभागाचे महाव्यवस्थापक बाबाजी कदम , मालवाहतूक विभागाचे कक्ष अधिकारी वैभव वाकोडे तसेच इंडियन ऑइल कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक (वंगण) सौमेन गांगुली , उपमहाव्यवस्थापक (संस्थागत व्यापार) ज्युबिन गर्ग आदी यावेळी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान , एसटीच्या चालकांनी कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त अंतर कापल्यास कोट्यवधी रुपयांची बचत होऊन त्याचा महामंडळाला नक्कीच फायदा होईल , असा विश्वास रघुनाथ कांबळे यांनी व्यक्त केला. तर डिझेलचा एक एक थेंब वाचवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणाऱ्या विभाग नियंत्रक तसेच आगार प्रमुखांचे बाबाजी कदम यांनी कौतुक केले.

Comments are closed.