Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत शिवसेनेला मोठा धक्का ; ३५ वर्षे कार्यरत वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा पक्षत्याग:

जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वावर केले गंभीर आरोप...

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गडचिरोलीत आणखी एक मोठा धक्का बसला असून, गेली ३५ वर्षे पक्षाशी निष्ठा राखत कार्यरत असलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने जिल्ह्यातील दिशाहीन नेतृत्व, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवरील सापत्नभाव आणि संघटनेतील अनुशासनहीन कार्यपद्धती यांचा ऊहापोह करत पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे.

या राजीनाम्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद, तणावपूर्ण वातावरण आणि नेतृत्वाबाबत कार्यकर्त्यांमध्ये वाढत चाललेली नाराजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या पत्रात बाळासाहेब ठाकरे यांचा ‘८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण’ हा आदर्श अंगीकारून त्यांनी दशकानुदशक जनतेचे प्रश्न, आंदोलनांतील आघाडी, मोर्चे, सामाजिक प्रश्नांवरील सातत्याचा लढा यांतून शिवसेनेची ओळख जपल्याचे नमूद केले आहे. पक्षात विभाजनानंतरच्या अस्थिर काळातही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला साथ सोडली नव्हती.

मात्र, गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश केदारी यांची कार्यशैली कार्यकर्त्यांच्या मनोबलावर प्रतिकूल परिणाम करणारी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यात पक्षासाठी निष्ठेने झटणाऱ्या जुन्या शिवसैनिकांना दुय्यम वागणूक देत, पक्षात कोणतीही कामगिरी नसलेल्या व्यक्तींना प्राधान्य देणे, पदवाटपात पक्षनिष्ठेपेक्षा ‘लागून-चालन’ या निकषाला महत्व देणे, संघटनात्मक संवादाचा अभाव आणि कार्यकर्त्यांशी विसंवाद निर्माण करणारी एकतर्फी निर्णयप्रणाली—या सर्व बाबींमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही चर्चा न करता जिल्हा सहसंपर्क प्रमुख हे पद अचानक काढून घेण्यात आले. यामुळे त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाचा अवमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पद नसल्याने जिल्ह्यातील संघटनात्मक उपक्रमांमध्ये अडथळे निर्माण झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, असे त्यांनी सांगितले.

येत्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून जनसंपर्क, संघटन उभारणी आणि मतदारांमध्ये ठोस पाया तयार करत होते. मात्र, सध्याच्या जिल्हा नेतृत्वाच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवारी मिळण्याच्या शक्यता धूसर झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

“३५ वर्षांच्या त्यागानंतरही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा अवमान करणारी कार्यपद्धती सहन करणे शक्य नाही. गडचिरोलीतील शिवसेनेची अधोगती ही चुकीच्या नेतृत्वाचा थेट परिणाम असून, अशा परिस्थितीत पक्षात राहणे आता अशक्य झाले आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षत्यागाची घोषणा केली आहे.

गडचिरोलीसारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यातील या राजीनाम्यामुळे शिवसेनेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे घडामोडी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. स्थानिक पातळीवर यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चिन्हेही दिसत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.