Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीच्या दामेश्वर गावात गांजाची शेती उघडकीस; शेतातच अंमली पदार्थाची साठवणूक करून विक्रीची तयारी

एक लाखाहून अधिक किंमतीचा गांजा जप्त; आरोपी मोहन कोवाचीला पोलीसांनी घेतले ताब्यात..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २० मे: जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दामेश्वर गावात शेतात गांजाची शेती करून घरातच साठवलेला अंमली पदार्थ विक्रीसाठी तयार ठेवणाऱ्या इसमाला गडचिरोली पोलिसांनी अटक करत एकूण १,१२,२४० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गोपनिय माहितीवरून पोलीस मदत केंद्र मालेवाडा, कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गांजा विक्रीसाठी घरातच ठेवला साठवून ..

१९ मे रोजी मालेवाडा पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून पोस्टे कोरचीचे  शैलेद्र ठाकरे, अभिजीत पायघन व त्यांच्या पथकाने दामेश्वर येथे मोहन यशवंत कोवाची (वय ४२) याच्या घरी छापा टाकला. झडती दरम्यान चार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओलसर, हिरवट व करड्या रंगाचा अंमली पदार्थ – गांजा आढळून आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पिशव्यांमध्ये पाने, फुले, बोंडे व बिया यांसह संपूर्ण कॅनाबिस वनस्पती असलेला एकूण २८.०५० किलो गांजा मिळून आला, ज्याची बाजारातील एकूण किंमत ₹१,१२,२४०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक चौकशीअंती आरोपीने हा गांजा स्वतःच्या शेतात उगवून विक्रीसाठी ठेवला होता, अशी कबुली दिली.

एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल..

या प्रकरणी पुराडा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(सी), २०(बी)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास  अभिजीत पायघन करत आहेत.

पोलिसांची संयोजित कारवाई..

या कारवाईत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शैलेद्र ठाकरे, पोउपनि. आकाश नाईकवाडी, पोउपनि. अभिजीत पायघन, व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागात अंमली पदार्थांचे जाळे पसरू नये म्हणून पोलीस यंत्रणा कटिबद्ध असून, येत्या काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

घरकुल व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

Comments are closed.