चंद्रपूरच्या जंगलात नरभक्षकाचा धुमाकूळ ;५ महिन्यांत २२ बळी, अखेर ‘TATR-224’ जेरबंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
चंद्रपूर : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालं असताना अखेर वनविभागाने नागभीड तालुक्यातील दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तब्बल पाच महिन्यांत २२ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघांच्या साखळीमध्ये ‘TATR-224’ हा नर वाघ महत्त्वाचा ठरतो. गुरुवारी (२३ मे) सकाळी ११.३० वाजता तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेठी बिटाजवळ त्याला डार्ट मारून पकडण्यात आलं.
मे महिन्यात ९ नागरिकांचा बळी, तेंदूपत्ता संकलकांचा प्रामुख्याने फटका..
यंदाच्या तेंदूपत्ता हंगामात वाघाच्या हल्ल्यांनी नागरिकांत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ९ नागरिकांचे मृत्यू वाघाच्या हल्ल्यांमुळे झाले असून, त्यामध्ये बहुतांश जण तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेले होते. जीव धोक्यात घालून रोजीरोटी मिळवणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
नागभीडच्या दोन हल्ल्यांनी माजवली खळबळ…
तळोधी परिक्षेत्रातील गंगासागर हेठी गावात १५ एप्रिल रोजी मारोती सखाराम बोरकर (वय ४५) यांच्यावर, तर १८ मे रोजी वाढोणा गावातील मारोती नकटू शेंडे (वय ६४) यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. या घटनांनी परिसरात भीतीचं वातावरण पसरवलं होतं. या नरभक्षकाच्या ठशांनुसार ‘TATR-224’ या ८ वर्षांच्या वाघाची ओळख पटली आणि शोधमोहीम तीव्र करण्यात आली.
व्यवस्थित नियोजन, यशस्वी मोहिमेचा परिपाक…
या धोकादायक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध मोहीम राबवली. उपवनसंरक्षक राकेश शेपट यांच्या नेतृत्वाखाली, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शार्पशूटर अजय मराठे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्यासह संपूर्ण टीमने अथक प्रयत्न करत ही मोहीम यशस्वी केली.
नरभक्षकांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज..
‘TATR-224’ ला पकडण्यात आले असले तरी वाघांच्या हल्ल्यांची मालिका थांबलेली नाही. मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा हा मानव-वाघ संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. वाढती वनसंख्या, अधिवासातील बदल, आणि मानव प्रवेशाचा प्रचंड दबाव या समस्या मूळ कारणीभूत आहेत. त्यामुळे केवळ वाघ पकडून हा संघर्ष थांबणार नाही, तर दीर्घकालीन उपाय, पुनर्वसन धोरणं आणि जंगलात मजूरांची सुरक्षितता सुनिश्चित करणारी ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक आहे.
Comments are closed.