Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल; गडचिरोली पोलिसांची ठोस कारवाई

शहरातील पाच ठिकाणी नाकाबंदी; वाहतूक अपघात रोखण्याचा पोलिसांचा निर्धार...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवून घेतलेल्या २४ पालकांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. २९ जून व ३ जुलै रोजी शहरातील विविध पाच ठिकाणी राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. संबंधित पालकांविरोधात मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, वापरात असलेली वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार, अल्पवयीन मुलांकडून परवाना नसताना वाहन चालवले जात असल्याचे आढळून आले. परिणामी, १४ पालकांवर २९ जून रोजी तर आणखी १० पालकांवर ३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणे हा कायद्याने दंडनीय अपराध ठरत असून, मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १९९ (ए) नुसार संबंधित पालक किंवा वाहनमालकाला तीन वर्षांपर्यंत कारावास, २५,००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच बालकावर बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत खटला चालविण्याची तरतूदही आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कारवाईदरम्यान शहरातील काही अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना पोलिसांच्या तपासणीत आढळली. या मुलांकडे वैध परवाना नसतानाही त्यांच्या पालकांनी वाहन वापरण्यास दिले होते. पोलिसांनी केलेल्या या तपासणीतून अपघातांमागील एक महत्त्वाचा कारणकारणभाव समोर आला असून, प्रशासनाने हे आव्हान गांभीर्याने घेतले आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी यासंदर्भात म्हटले की, “या मोहिमेचा उद्देश अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी जबाबदारीने वागून आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे आवश्यक आहे. केवळ पोलिसांवर जबाबदारी न ठेवता समाजानेही सहकार्य करावे.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यापुढे अशी मोहिम अधिक कठोरपणे राबविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सदर मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गोकुळराज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सपोनि. शरद मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयमाने आणि दक्षतेने कामगिरी पार पाडली.

गडचिरोली शहरातील वाहतूक संस्कृती सुधारण्यासाठी ही मोहीम एक टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अपघात रोखण्यासाठी आणि अल्पवयीन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या या कडक भूमिकेचे विविध स्तरांवरून स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.