मराठा आरक्षण प्रकरणात केंद्राने लक्ष देण्याची गरज- ना. अशोकराव चव्हाण
नांदेड, दि. १५ फेब्रुवारी: मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांची टिम राज्यशासनाने उभी केली आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण मनातून प्रयत्न करत आहोत. परंतु आता ही लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय अॅटर्नी जनरलने केंद्राची भूमिका मांडली पाहिजे. या प्रकरणात पंतप्रधानाच्या माध्यमातून केंद्रांने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. मराठा वधु-वर सुचक मंडळाच्या 17 व्या मराठा वधु-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
यासाठी उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने मी प्रामाणिकपणे मराठा समाजाची बाजू नामवंत वकिलाच्या माध्यमातून सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडतो आहे. राज्यासह देशातील नामवंत विधिज्ञ सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्रीय पातळीवर देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांनी प्रधानमंत्री याच्यांकडे मराठा आरक्षणाच्या अनुकूल बाजूने न्यायालयात आपली भूमिका मांडण्यासाठी केंद्रातील अॅटर्नी जनरल यांच्याकडे पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली पाहिजे.इतर राज्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला मात्र वेगळा न्याय असे होता कामा नये, असेही ते म्हणाले. मराठा समाजाच्या विकासासाठी ज्या इतर बाबी आहेत, यावरही मी लक्ष केंद्रित केले आहे. मराठा समाजाचे प्रश्न मी प्रामाणिकपणे सोडण्याचा प्रयत्नही करेल असेही अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.
वधु-वर सुचक मेळाव्या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मराठा वधु-वर परिचय मेळावा घेणे काळाची गरज असून यातून समाजाला फार मोठी मदत होते. ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यासाठी वधु-वर परिचय मेळावा घेणे गरजेचे आहे.
Comments are closed.