केंद्रीय पथकाकडून दुसऱ्यांदा पूरबाधित क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद
गडचिरोली, दि. 24 डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुक्यात ऑगस्टमध्ये आलेल्या पूरामुळे बाधित झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून दुसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. यामध्ये वडसा तालुक्यातील सावंगी, कोंढाळा या गावात तर आरमोरी तालुक्यातील देऊळगाव या गावात पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पूरपरिस्थितीनंतर शासनाकडून मदत मिळाली का ? नूकसान झालेल्या क्षेत्रात आता काय आहे व किती उत्पन्न मिळाले? याबाबत त्यांनी चौकशी केली. यावेळी बाधित क्षेत्राची त्यांनी सविस्तर सद्यास्थिती पाहिली. दाखल झालेल्या केंद्रीय पथकात सहसचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर बी कौल उपस्थित होते. सोबत विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम व तहसिलदार देसाईगंज व आरमोरी यावेळी उपस्थित होते. यानंतर त्यांनी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील पूरबाधितांना मिळालेली मदत : पूरपस्थिती दरम्यान चार तालुक्यातील एकूण 219 गांवे प्रभावित झालेली होती. यातील 24676 शेतकऱ्यांचे 18263 हेक्टर धान, 3929 कापूस असे एकूण 22193 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. या सर्व क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडून 237 कोटी रूपये नुकसान मंजूर झाले त्यातील 99.49 टक्के निधी वितरीतही करण्यात आला आहे. तसेच 48 तासांपेक्षा जास्त काळ पूराच्या पाण्यात घर असलेल्या 645 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रूपयांप्रमाणे 64.6 लक्ष रूपये वाटप करण्यात आले होते. दुर्दैवाने गडचिरोलीत 1 मृत्यू झाला होता त्यांना 4 लक्ष रूपयांची मदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी जनावरे इतर पशू दगावले त्यासाठी 54 हजार मदत दिली गेली. घरांमध्ये पूर्ण नूकसान झालेली 6 घरे, काही प्रमाणात नूकसान झालेली 72 घरे व पुर्ण नूकसान झालेले गोठा 10 अशा मिळून सर्व नूकसानाचे 9.73 लक्ष भरपाई देण्यात आली. या मदतीबाबत आलेल्या पथकाने आढावा घेतला. सदर मदतीमध्ये राज्य व केंद्र अशा दोन्ही निधीचा समावेश आहे.
याव्यतिरीक्त बैठकिमध्ये विविध सार्वजनिक इमारती, रस्ते तसेच वीज महामंडळाचे झालेले नुकसान याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबतचा निधी अजून मंजूर होणे बाकी आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
उद्याही काही गावांना पथकाकडून भेटी: जिल्हयातील गडचिरोली व आरमोरी तालुक्यातील काही गावांना पथक भेटी देणार आहे. यावेळी रस्ते, सार्वजनिक इमारती व शेतीची पाहणी केली जाणार आहे. यानंतर पथक चंद्रपूर जिल्हयासाठी रवाना होणार आहे.
Comments are closed.