नाशिक विभागातील पर्यटन स्थळांचा संपूर्ण विकास करावा – राज्यमंत्री आदिती तटकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, 22 डिसेंबर: नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा एमटीडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास करून त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा आणि ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावित, अशा सूचना पर्यटन, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.
आज नाशिक येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ग्रेप रिसॉर्ट येथे आढावा बैठकीत राज्यमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आषुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदिप संख्ये आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा पर्यटक अधिक प्रमाणात लाभ घेवू शकतील. तसेच नाशिक येथील गंगापूर कन्वेन्शन केंद्र, कलाग्राम केंद्र, यासोबतच नंदूरबार जिल्ह्यातील संगमेश्वर, केदारेश्वर मंदिर परिसर आदी पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून तेथील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे पूर्ण करण्यात यावीत. विभागातील सर्व पर्यटन स्थळांचा विकास करत असतांना कालबध्द कार्यक्रम निश्चित करून प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. कुठलेही काम अपूर्ण अवस्थेत ठेवू नये अथवा अंशत: पूर्ण करू नये, असेही राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
बैठकीनंतर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी करून गंगापूर येथील बोट क्लब प्रकल्पास देखील भेट दिली. तसेच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी बोटींगचे पहिले तिकीट काढून बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर ह्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या.
द एस.एस.के. वर्ल्ड क्लबला भेट
बैठकीपूर्वी नाशिक येथील पाथर्डी शिवारातील सर्व क्रीडा सुविधांनी युक्त द एस.एस.के. वर्ल्ड क्लबची उद्योग आणि खनिकर्म, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदीती तटकरे यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, माजी आमदार जयंत जाधव, द एस.एस.के. वर्ल्ड क्लबचे संचालक शैलेश कुटे व डॉ. राजश्री कुटे आदी उपस्थित होते.
सहा एकर मध्ये तयार करण्यात आलेल्या या क्लबमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस व बास्केटबॉल कोर्ट, मिनी थिएटर, स्वीमिंगपूल, कॅरम, चेस, रायफल शुटिंग, कार्ड्स व स्नुकर रूम आदी क्रीडा सुविधांची राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी माहिती घेतली. 35 एकर जागेपैकी 6 एकर जागेत एस.एस.के.स्पोर्ट्स क्लब तयार करण्यात आले आहे. एस.एस.के.स्पोर्ट्स क्लबचे आजपर्यंत जवळपास चारशे सभासद असल्याची माहिती क्लबचे संचालक श्री. कुटे यांनी यावेळी दिली.
Comments are closed.