पुण्यात काँग्रेसला खिंडार, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे: काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत काल पक्षप्रवेश केला. धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेते आहेत, कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. २५ वर्ष ते पुण्याचे नगरसेवक राहिले आहेत, तर त्यापैकी १० वर्ष त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून काम केलं. मात्र आता धंगेकर यांनी पुन्हा धनुष्यबाण हाती घेतला आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. तसंच त्यांचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या धंगेकर यांना ४ लाख ६० हजार मतांमधून त्यांचं काम आणि लोकप्रियता दिसून येत असल्याचे शिंदे म्हणाले.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण आपल्याला लोकांनी हलक्यात घेतलं. मात्र त्यानंतर जे घडलं त्याची जगातल्या ३३ देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिलं आहे. आपण शिवसेनेकडून ८० पैकी ६० आमदार निवडून आणले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेनं शिक्कामोर्तब केला. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललो आहे, असे ते म्हणाले. तर २०१९ केवळ खुर्चीसाठी मोह केलेल्याना जनतेनं या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याचा टोला त्यांनी लगावला. मात्र आपल्याला खुर्चीचा मोह नाही तर महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे, असं शिंदे म्हणाले. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोट्या आवाजातील व्हिडिओ दाखवण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर अधिक फायदा झाला असता, कोणी कुठे गेलेच नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
तर शिवसेनेत आपण १० वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होतो. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षात कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी धंगेकर यांच्या सोबत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे, प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
Comments are closed.