Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठी लोकभाषा संवर्धन : एक चिंतन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मानवी जीवनात भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगभरात हजारो भाषा अस्तित्वात आहेत. भाषा व संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गणेश देवी यांच्या संशोधनानुसार, जगातील चार हजार भाषांपैकी निम्म्याहून अधिक भाषा येणाऱ्या ५० वर्षांत नष्ट होण्याची शक्यता आहे. भाषा संवर्धनासाठी प्रादेशिक बोलींचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी नोंदवले आहे. काळाच्या ओघात मराठीच्या बोलीभाषा लोप पावत आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करणे, ही प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी आहे.

भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृतीच्या संवर्धनाचेही कार्य करते. ती ज्या मातीत जन्मते, त्या संस्कृतीशी तिचे नाते असते. समूह, स्थळ, काळ आणि प्रसंगानुसार बोलली जाणारी भाषा म्हणजे लोकभाषा. समूहाच्या माध्यमातून ती प्रवाही होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मराठी लोकभाषेवर चिंतन करण्याचा हा प्रयत्न आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकभाषेचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

देहबोली व हावभावाद्वारे होणारा ध्वनीविरहित संवाद काही प्रसंगी प्रभावी ठरतो, परंतु त्याला मर्यादा आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात भौगोलिक अंतरावरूनही भाषेच्या सहाय्याने संवाद होतो, मात्र ध्वनीविरहित भाषेत ते शक्य नाही. विचारांची देवाणघेवाण आणि स्पष्ट संवादासाठी भाषा आवश्यक आहे. बोलीभाषा अधिक उपयोगी ठरते कारण ती सहज आणि स्वाभाविक असते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र आणि त्याच्या सीमाभागांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. जगभर पसरलेल्या मराठी भाषिक समाजातही ती जिवंत आहे. “दर बारा कोसांवर भाषा बदलते” असे म्हणतात, पण एकाच कुटुंबातील सदस्यांचीही भाषा सारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची विशिष्ट लकब असते. मातृभाषा ही हृदयाची भाषा असल्याने, झोपेत पडणाऱ्या स्वप्नांमध्येही संवाद मातृभाषेतच होतो. विचारांचे चलनही मातृभाषेतूनच घडते.

ग्रामीण बोलीभाषेचे वैशिष्ट्य

मराठी भाषेत विविध बोली आहेत. ग्रामीण भागातील बोलींना विशेष महत्त्व आहे. समूहाच्या गरजेनुसार या बोली घडत गेल्या आहेत. वय, लिंग, सामाजिक परिस्थितीनुसार बोलींमध्ये वैविध्य दिसते. बायकांच्या गप्पांमधून, पुरुषांच्या चर्चांमधून आणि मुलांच्या खेळांमधून लोकभाषेचे विविध रंग अनुभवता येतात.

लोकभाषा अत्यंत रसपूर्ण आणि प्रभावी असते. प्रसंगानुसार तिचे विविध रंग दिसतात—हसरी, नाचरी, दुखरी, बोचट, मधुर, अद्भुत, करुण, धाडसी, समंजस आणि चिकित्सक. लोकभाषा समूहाला जोडते आणि सांस्कृतिक प्रवाह टिकवून ठेवते. तिचा विस्तार मराठी ग्रंथसंपदेच्या पलीकडे आहे. लोकभाषा पुस्तकी ज्ञानातून आलेली नसून ती समाजाच्या जिवंत संवादातून निर्माण झाली आहे.

लोकभाषा संवर्धनाची गरज

मराठी लोकभाषेचे जतन आणि संवर्धन अत्यावश्यक आहे. तिचे लेखी स्वरूप जपले तर ती अधिक प्रभावी होईल. काही लेखकांनी त्यांच्या साहित्याद्वारे लोकभाषेचे दर्शन घडवले आहे, पण हे प्रमाण अल्प आहे. संशोधकांनी लोकभाषेचा अभ्यास केल्यास तिला समृद्ध करण्यासाठी ठोस दिशा मिळू शकते.

महाविद्यालयीन युवकांची भूमिका येथे महत्त्वाची ठरते. शहरी भागातील तरुण प्रमाण भाषा वापरतात, तर ग्रामीण विद्यार्थी आपली लोकभाषा टिकवून ठेवतात. त्यांच्यातील संवाद आणि चर्चा लोकभाषेला जिवंत ठेवतात. संशोधनाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले, तर मराठी लोकभाषेला एक नवा आयाम मिळू शकतो.

लोकभाषा ही मराठी भाषेचा आत्मा आहे. तिचे लेखन आणि अभ्यास वाढवला, तर ती पुढच्या पिढ्यांसाठी टिकू शकेल. लोकभाषा टिकली तरच मराठी भाषा जिवंत राहील. संशोधन, लेखन आणि संवादाच्या माध्यमातून तिचे संवर्धन केल्यास, जुनी संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि मराठी भाषा युगानुयुगे समृद्ध राहील.

-डॉ. सविता गोविंदवार, सहायक प्राध्यापक, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

Comments are closed.