कोरोनामुळे नोकरी गेली म्हणून लग्न नाही.
यंदा 60 टक्के लग्नांची नोंदणी कमी झाल्याची आकडेवारी सामोर आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. १ डिसेंबर: शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत असताना, आता कोरोनामुळे शहरातील तरुणाच्या नोकर्या गेल्यामुळे मुंबई-उपनगरातील तरुणांची लग्ने रखडण्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरवर्षी मुंबई उपनगरात तीन हजारांहून अधिक लग्नांंची रजिस्टर कार्यालयात नोंदणी होेते. मात्र, यंदा 60 टक्के लग्नांची नोंदणी कमी झाल्याची आकडेवारी सामोर आली आहे. बहुंताश तरुणांचे कोरोना लॉकडाऊनमुळे रोजगार गेले, त्यामुळे यावर्षी अनेकांना आपल्या लग्नाचा विचार पुढे ढकलावा लागत आहे. कारण नोकरी नाही तर छोकरी नाही, अशा कोंडीत सध्या तरूण सपडलेे आहेत.
प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील लग्न हा महत्वाचा भाग आहे. मात्र यावेळी अनेकांच्या लग्नांवर कोरोनामुळे विरजन पडले आहे. ऐन लग्नसराईच्या काळात आलेल्या कोरोनाची साथ आणि लॉकडाउनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीत मिळाले आहे. कोरोनामुळे यंदा लग्न करु इच्छिणार्या अनेक तरुण-तरुणींना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. तसेच लॉकडाउनमुळे अनेक तरुण-तरुणींच्या नोकर्या गेल्याने आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मुंबई आणि उपनगरात खासगी कंपनीत काम करणार्या तरुण-तरुणींची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत अनेक उद्योगांना फटका बसला असून हॉटेल, रिटेल आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग बंद पडल्याने लाखो कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदा लग्न करण्याचा विचार असलेल्या तरुणांना तो बेत रद्द करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना ठरलेले लग्न नोकरी गेल्यामुळे मोडावे लागले आहे.
कोरोना काळात कमी खर्चात रजिस्टर लग्नाचा पर्यायही बहुतेक मुंबईतील तरुण स्वीकारतील, असे वाटत होते. पण मुंबई शहर व उपनगरातील रजिस्टर लग्नांची संख्या यंदा सुरुवातीपासून कमी झालेली दिसत आहे. मुंबई शहरात गेल्या वर्षी 1 हजार 299 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली होती. मात्र कोरोना काळात नोंव्हेबरपर्यंत 448 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत. हीच परिस्थिती उपनगरातील मॅरेज रजिस्टर कार्यालयात दिसून येत आहे. गेल्या वर्षी 3 हजार 495 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली होती. यंदा 1 हजार 806 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत.
नोेंदणी झालेले विवाह
वर्ष 2018 2019 2020
मुंबई 1341 1299 448
उपनगर 3707 3495 1806
कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी अनेक इच्छुकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. परिणामी, आजही दिवसाला सरासरी दोन ते तीनच विवाह रजिस्टर होत आहेत. आता लग्नसराईचा काळ येत असल्याने विवाह रजिस्टर करण्याची संख्या वाढेल अशी आशा आहेत.
- मीना आंबिलपुरे, विवाह अधिकारी, मुंबई शहर
कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकर्या गेल्यामुळे राज्यातील 50 टक्के तरुणांनी आपले लग्न यंदा रद्द केले आहे. तर काही जणांचे लग्न अगोदरच जुळले होते. मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर नोकरी गेल्याने त्यांच्यापुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. आता अगोदर नोकरी शोधा आणि नंतर छोकरी, अशी अनेकांनी अवस्था झालेली आहे.
- धर्मेद्र चव्हाण, सचिव, पुरुष हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र
Comments are closed.