देऊळगाव धान खरेदी केंद्रातील कोट्यवधींचा अपहार – दोन आरोपी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात घडलेल्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी म्हणजे प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर (रा. यवतमाळ) व विपणन निरीक्षक हितेश व्ही. पेंदाम (रा. आरमोरी) हे असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
या प्रकरणात सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वित्तीय वर्षांत तब्बल रु. ३,९६,६५,९६५/- इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनांना मोठा धक्का बसला असून, कृषी व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन वर्षातील अपहाराचे स्वरूप.
गडचिरोली जिल्ह्यातील उप-प्रादेशिक कार्यालय, कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव धान खरेदी केंद्रावर २०२३-२४ मध्ये १९,८६०.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी केवळ १५,९१६.३२ क्विंटल धानच जावक दाखवण्यात आले, उर्वरित ३,९४४.०८ क्विंटल धानाचा ठावठिकाणा मिळालेला नाही. तसेच, एकदाच वापरले जाणारे बारदान देखील जास्त प्रमाणात वापरल्याचे दाखवण्यात आले. परिणामी रु. १,५३,९३,९८०/- चा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
तसेच, २०२४-२५ या हंगामात १७,२६२.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. प्रत्यक्षात ११,१२२.४० क्विंटल धानच केंद्रावर अस्तित्वात आढळले. उर्वरित ६,१४०.०० क्विंटल धान गायब असून, पुन्हा बारदानाच्या वापरातही तफावत आढळली. त्यामुळे या वर्षी रु. २,४२,७२,८८५/- चा अपहार समोर आला आहे.
अधिकाऱ्यांची दुर्लक्ष आणि जबाबदारांची चौकशी.
ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संबंधित खरेदी केंद्र प्रमुख, सचिव, संचालक मंडळाचे सदस्य आदींची भूमिका संशयास्पद ठरली. यामध्ये एकूण १६ जणांची नावे पुढे आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या अनुषंगाने उप-प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलिस स्टेशन कुरखेडा येथे आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) भान्यासं अन्वये दाखल करण्यात आला असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
धान खरेदीमध्ये कारवाईचा वेग आणि पुढील तपास सुरू..
धान खरेदी संदर्भांत गुन्हा दाखल होताच गडचिरोली पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत मुख्य आरोपींना अटक केलीआहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, तसेच उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र वाघ व त्यांच्या टीमने पार पाडली.
या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यात कशा अडकतात, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Comments are closed.