लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
गडचिरोली: शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते,महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या पाठपूराव्यामुळे शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या ढिवर समाजातील ३५ कुटूंबांना वेअर हाऊस काॅर्पोरेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पा अंतर्गत घरकुल बांधून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ढिवर समाजाची असलेली बिकट परिस्थिती आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतांना येणाऱ्या अडचणींमुळे हा समाज विकासापासून वंचित आहे. सदर बाब लक्षात घेवून शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी मुंबई येथील सेंटर ऑफ ट्रान्सफार्मींग इंडिया या संस्थेला ढिवर समाजाच्या सदर परिस्थितीचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. संस्थेच्या संचालिका आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे पथक पाठवून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून सर्वेक्षण केले असता ढिवर समाजाच्या दारिद्र्याचे भिषण वास्तव समोर आले. यात आरोग्य,शिक्षण, रोजगार यासोबतच निवासाची बिकट अवस्था लक्षात घेता संस्थेच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला सेंट्रल वेअरहाऊस काॅर्पोरेशन, नवी दिल्ली यांचेकडून मंजूरी मिळाल्याने आता त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गडचिरोली तालुक्यातील गुरवळा, मुडझा, काटली व चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली, सगणापूर, हळदी या गावातील गरजू ढिवर कुटूंबांना ३५ घरकुलांचे बांधकाम करुन देण्यात येणार आहेत. तसेच ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पा अंतर्गत लवकरच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या योजनाही संस्थेच्या वतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सातत्याने पाठपुरावा करुन ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प आणि त्याअंतर्गत घरकुलांचा गरजूंना लाभ मिळवून दिल्याबद्दल सीएफटीआय च्या संचालिका चित्रलेखा पाटील, अमीत देशपांडे, प्रसाद मुनगेकर, शेकाप नेते भाई रामदास जराते आणि महिला नेत्या जयश्रीताई जराते यांचे भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, विनोद मेश्राम, मारोती आगरे, चंद्रकांत भोयर, रामदास दाणे, किसन साखरे, महेंद्र जराते, देवेंद्र भोयर, योगेश चापले, अशोक ठाकूर आणि घरकुल लाभार्थी व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहे.