बुलढाणा अपघाताच्या धर्तीवर जिल्हाधिका-यांनी घेतली बस वाहतुकदारांची बैठक
नियमांचे पालन करण्याचे निर्देश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 10 जुलै – बुलढाणा येथे नुकत्याच घडलेल्या ट्रॅव्हल्स अपघाताच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, व असे अपघात टाळता यावे, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी खाजगी बस वाहतुकदारांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, परिवहन निरीक्षक विलास ठेंगणे व खाजगी बस वाहतुक प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खाजगी बस वाहतुकदारांनी करावयाच्या उपाययोजनेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यात बसला आपत्कालीन दरवाजा असणे आवश्यक आहे, योग्यता प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची नियमित तपासणी, अग्निशामक यंत्रणा असणे, स्पीड गव्हर्नर उल्लंघन, बसला लाईट्स, इंडिकेटर्स इ., दारू पिल्याची तपासणी व शाररिक क्षमता तपासणी करीता वाहन चालक ब्रेथ ॲनलायझर, चालकाकडून वारंवार होणारे रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अपघातास कारणीभूत ठरत असलेले वाहनांचे डोळे दिपवणारे लाईट्स इंडिकेटर, स्टॉप, बॅकलाईट, रिफ्लेक्टर, हॉर्न, बस मधील प्रकाश योजना, बसमध्ये आपत्कालीन बाहेर निघताना पूर्वसुचना देणारी यंत्रणा बसविणे इत्यादी बाबींचा समावेश होता.
सर्व खाजगी बस वाहतुकदारांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. तशा सुचना आपापल्या आस्थापनांमधील कर्मचारी तसेच चालक / वाहकांना द्याव्यात. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी बजावले. अपघात झाल्यास वाहनातील प्रवाशांनी, चालक, वाहक तसेच आदींनी आपात्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रामायण ट्रॅव्हल्स, डीएनआर ट्रॅव्हल्स, पर्पल ट्रॅव्हल्स, कोमल ट्रॅव्हल्स व इतर वाहतुक प्रतिनिधी उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.