Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यभर ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी लसीकरणाची खूण म्हणून संबंधितांच्या बोटांवर शाई लावावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ८ जानेवारी: महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे, मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरित्या झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तींना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली जाते तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक नाहीतर राज्य शासन त्याची अमंलबजावणी करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी दिली.

सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल त्यावळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहितीही श्री. टोपे यांनी दिली. केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहिम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, आज झालेल्या ड्रायरनचे राज्यस्तरावरुन संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले. सर्व जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन केले.
ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले. त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा



Comments are closed.