Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु असलेले देशातील एकमेव महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिंधुदुर्गनगरी, 6 जून- कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच असा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सावंतवाडी शहर व सावंतवाडी मतदार संघातील विविध 110 कोटी रुपये विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकास व क्रीडामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार भरत गोगावले, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच युवा पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मुलभूत सुविधांबरोबरच आरोग्य सुविधाही जिल्हा तालुका पातळीपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगत होत आहे. यासाठी केंद्राकडूनही मदत मिळत आहे. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देवून निधी देण्यात येत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. भारत देश प्रगतीने विकास करत असून देशाची अर्थव्यवस्था ११ क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. तसेच जी-२० चे अध्यक्षपद आपल्या देशाला मिळाले ही अत्यंत गौरवाची बाब आहे. केंद्र सरकारने सहकार विभागाच्या माध्यमातून १० हजार कोटी आयकर माफ केला आहे. त्यामुळे सहकार विभागाला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून या राज्य शासनाच्या कालावधीत १ लाख १४ हजार कोटी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्ता करुन कोकणाच्या, विकासासाठी कोकण प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे काम सुरु केल्याचे सांगितले. कोकणातील कोस्टल रोड एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. कोकणात सबमरीन सुरु करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. त्या‍चबरोबर कोकणातील स्थानिक मालाचे ब्रॅंडिंग करुन मार्केटिंग उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडी शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलही उभारण्यासाठी निधी देवू. तसेच विकास टप्पा क्रमांक २ साठी मागणी नुसार आवश्यक सर्व निधी दिला जाईल. असे आश्वासित करुन समृध्द कोकण घडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, कोकणाचा गतीमान विकास होण्यावसाठी दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दोडामार्ग येथे सुरु झालेल्या एमआयडीसी मध्ये जास्तीत जास्त उद्योग येतील. यासाठी केंद्र व राज्य शासन जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.प्रास्ताविकात शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले, जास्तीत जास्त उद्योग हे सिंधुदुर्गामध्ये आणून येथील युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, जेणेकरुन स्वयंरोजगाराचे केंद्र हे सिंधुदुर्ग ठरेल. गोवा राज्यामध्येे ज्याप्रमाणे उत्कृष्ट पर्यटन त्याच धर्तीवर सिंधुदुर्गमध्ये उत्कृष्ट पर्यटन निर्माण होणे आवश्यक आहे.

पर्यटनासाठी सर्व सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. कमीत कमी खर्चामध्ये सावंतवाडी येथे नदी शुध्दीकरण हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सावंतवाडी शहरात नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोती तलावाच्या मध्यभागी बांधण्यासाठी 1 कोटी दिला जाईल. असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. या कार्यक्रमांचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर विकसित करणे, सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदान येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणे, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत अग्निशमन केंद्र व अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा निवासस्थान बांधकाम, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्य स्तर) योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरातील पाणी पुरवठा योजना सुधारणा, सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेली वितरण व्यवस्था बदलणे आदींसह सुमारे 110 कोटी रुपये कामांचा शुभारंभ करण्यात आला. हळवल तालुका कणकवली येथील वारकरी संप्रदायला वाहन लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हळवल ता. कणकवली येथील वारकरी संप्रदायाला प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिले. या वाहनाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ला येथे करुन हळवल वारकरी संप्रदायाला शुभेच्छा देत अभिनंदन केले.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.