वारसांना तातडीने वीज जोडणी देत उर्जामंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन !
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वीजजोडणीचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 25 जानेवारी: स्वातंत्र्यलढ्यात १९४२ साली इंग्रजांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांच्या वारसांना तातडीने कृषी पंप वीज जोडणी देत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हुतात्म्यांना अनोखे अभिवादन केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्याचे वारसही महावितरणच्या माध्यमातून मिळालेल्या या अनोख्या मदतीने भारावून गेले.
या अनोख्या अभिवादनाने भारावलेल्या 10 शेतकऱ्यांनी आपले थकित कृषी पंप वीज बिल भरण्याचा संकल्प याप्रसंगी जाहीर केला.आणि वीज बिलही भरले.
सहकार मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कृषी पंपांना वीजजोडणी देत शासनासह महावितरणने हुतात्म्यांना अनोखे अभिवादन केले आहे.
१९४२ साली ८ सप्टेंबर रोजी वडुज तहसील कचेरीवर काढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मोर्चावर इंग्रजांनी केलेल्या अमानुष गोळीबारात खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा.) येथील ७ जण हुतात्मा झाले होते. त्यातील हुतात्मा आनंद गायकवाड व रामचंद्र सुतार यांचे नातवांनी महावितरणकडे नुकताच शेती पंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्याची दखल घेत हुतात्म्यांच्या वारसांना तात्काळ वीज जोडणी देण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या.
राज्य सरकारने नुकतेच ‘कृषी धोरण-२०२०’ आणले असून, त्या अंतर्गत भारतीय सेनेमधील (भूदल, नौदल व वायूदल) आजी व माजी सैनिकांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या धोरणांचा भाग म्हणून हुतात्म्यांच्या वारसांनाही या प्राधान्यक्रमानुसार जोडणी देण्यात आली आहे.
‘कृषी धोरण-२०२०’ अंतर्गत सातारा जिल्ह्यात कृषी वीज जोडणीचा शुभारंभ करण्यासाठी शासनाच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वत: वडगाव (ज.स्वा.) येथील हुतात्म्यांच्या बांधावर गेले. तेथे जाऊन हुतात्मा आनंद गायकवाड व रामचंद्र सुतार यांचे नातू अनुक्रमे शैलेशकुमार दथरथ गायकवाड व उमेश जगन्नाथ बेलवडकर यांच्या वीज जोडणीचा शुभारंभ केला. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, ‘शेतकऱ्यांना महावितरणने नेहमीच चांगली सेवा दिली आहे. वापरलेल्या विजेचे आपण सर्व देणे लागतो. या भावनेतून शेतकऱ्यांनी विजेचे बील भरले पाहिजे व महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे.’
अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी कृषी धोरणांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. याप्रसंगी १० शेतकऱ्यांनी तातडीने वीजबिल भरुन, थकबाकीमुक्त होण्याचा संकल्प केला. यावेळी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, वडगावचे ग्रामस्थ, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे व वीज कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणचा हेवा वाटतो…
मी अगदी दोन महिन्यांपूर्वीच डिमांड भरले होते. वीज जोडणी देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या रुपाने शासनच आमच्या बांधावर आले. हुतात्म्यांना अशा प्रकारेही गौरवले जाऊ शकते, हा विचार केल्याबद्दल शासनाचे आभार. याबद्दल मला महावितरणचा हेवा वाटतो.
Comments are closed.