साने गुरुजी यांच्या १२१ व्या जयंतीदिनी ‘श्रमजीवी सेवा दलाची’ स्थापना
सेवा, समता आणि संघटना या त्रिसुत्रीने श्रमजीवी सेवा दलाचे सैनिक हे राष्ट्र सेवा दलाचे कार्य पुढे नेतील – विवेकभाऊ पंडित
उसगाव, २४ डिसेंबर: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, साहित्यिक असे पुज्यनिय साने गुरुजी यांच्या १२१ व्या जयंतीदिनी ‘श्रमजीवी सेवा दल’ या श्रमजीवी संघटनेच्या नव्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. उसगव डोंगरी या श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच श्रमजीवी सेवादलाच्या सैनिकांकडून श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक मान. विवेक भाऊ पंडित, संस्थापिका मान. विद्युल्लता पंडित, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, राष्ट्र सेवादलाचे माजी सचिव आणि विधायक संसदचे माजी सदस्य, प्राध्यापक श्री. दत्ताराम मणेरीकर व त्यांच्या पत्नी उषा मणेरीकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. रामकृष्णन अय्यर सर, उद्योजक व हितचिंतक श्री. सुरेंद्र कल्याणपूरकर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक पुष्पत जैन, शाहीर दत्तात्रेय म्हात्रे यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा, समता आणि संघटना या त्रिसुत्रीचा अवलंब करत राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘श्रमजीवी सेवा दल’ या श्रमजीवी संघटनेच्या नव्या शाखेची स्थापना आज साने गुरुजी यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. यावेळी श्रमजीवी सेवा दलाच्या सैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध संचालन करून तसेच वेगवेगळ्या व्यायामाच्या प्रकारांचे प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची माने जिंकली. उसगाव डोंगरी येथे सेवा दलाच्या शाखा नायक आणि उप शाखा नायकांना शाखा तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक २० डिसेंबर पासून ६ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील ३५८ शिबिराथी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणानंतर या चारही जिल्ह्यात ‘श्रमजीवी सेवा दलाच्या’ १५१ शाखा सुरु करण्यात येणार आहेत. “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या विचारांवर आधारित श्रमजीवी सेवा दलाचे सैनिक काम करतील असा विश्वास श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांनी व्यक्त केला.
युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता.सेवा इत्यादींची शिकवण देण्यासाठी साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी श्रमजीवी सेवादल नक्कीच यशस्वी ठरेल असा विश्वास श्रमजीवी संघटनेचे संस्थापक श्री विवेक पंडित यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी एस एम जोशी यांच्याविषयीआठवणींना उजाळा दिला. अन्यायाच्या विरोधात श्रमजीवी संघटना उभी राहिली त्यावेळी श्रमजीवी संघटनेला नक्षलवादि ठरवण्याचे काम काही प्रस्थापितांनी सुरु केले होते त्यावेळी एस एम जोशी धावून आले व पाठीशी उभे राहिले तसेच त्यावेळी त्यांनी सांगितले कि, विवेक आणि विधुल्लता यांना तुम्ही मारले तरी हि संघटना संपणार नाही. त्याचा लढा पुढे न्यायला हा एस एम जोशी इकडे येईल. त्यावेळी त्यांनी आपली बाजू सत्याची असून चालणार नाही तर, सत्याच्या मागे संघटनेची ताकत असावी लागते. ते जर आज असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता असे श्री पंडित म्हणाले.
श्रमजीवी सेवा दलाच्या स्थापनेच्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा. मणेरीकर यांनी श्रमजीवी संघटना आणि विवेकभाऊ व विधुल्लता पंडित यांच्याविषयी बोलताना, “ज्याप्रमाणे मला एस एम जोशी यांचा सहवास लाभल्याचे जसे मी भाग्य मानतो तसेच भाग्य मी विवेकभाऊ आणि विधुल्लता ताई यांचा सहवास लाभल्याचे भाग्य मानतो” असे गरवोद्गार काढले. तर “सत्यासाठी ठाम रहा व रांजले गांजलेल्याना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज राहा असे म्हणत भविष्यात संघटनेची धुरा तुम्हीं यशस्वीपणे सांभाळणार याची मला खात्री आहे असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. तसेच श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता ताई पंडित यांनी “श्रमजीवी सेवादलाच्या सैनिकांवर खूप मोठी जबाबदारी आली आहे. त्यासाठी त्यांनी सशक्त, बलवान व्हायला पाहिजे, बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल, गरिबांची सेवा करावी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढावे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी आमदार विलास तरे, पद्माकर भोईर, अशोक गायकवाड, विनोद पाटील, सुधाकर पाटील, सुधाकर जाधव, श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, उपकर्याध्यक्षा स्नेहा पंडित – दुबे, सरचिटणीस श्री. बाळाराम भाईर व श्री विजय जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, यांच्यासह विधायक संसद व समर्थन संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.