७० वर्षानंतरही कुंभकोट देवस्थान उपेक्षितच.. शासनाची अनास्था तरीही यात्रेत लोटली भाविकांची अलोट गर्दी
कोरची, दि. २० जानेवारी: कोरचीयेथून अवघ्या चार किमी अंतरावरील कुंभकोट येथे दि. २० जानेवारीला मंडई भरली. तालुक्यातील ६० गावाची मंडई म्हणून या मंडईला ओळखले जाते. कुंभकोटच्या मंडईला गडचिरोली जिल्ह्या सह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, छत्तीसगड राज्यातील राजनांदगांव ईत्यादी जिल्ह्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात.
या मंडईला देवमंडई असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे या मंडईला महत्त्व आहे. तालुक्यात कोणत्याही गावात कोणत्याही प्रकारची पुजा अर्चा करण्यापूर्वी कुंभकोट च्या राजमातेचे पूजन केले जाते. त्यानंतरच ईतर गावात ग्रामीण देवी देवतांची पूजा केली जाते.
या ठिकाणी दि. १९ जानेवारी पासूनच विविध प्रकारची दुकाने सजली. पुजेच्या साहित्याची दुकाने, लहान मुलांसाठी फुगे, प्लास्टिकच्या खेळण्या, मिठाई, अल्पोपहार करीता हॉटेल, आकाश पाळणे, चक्र, ई. आणि ईतर नेहमीची दुकाने सजली होती. लहान मुले, युवा आणि वृध्द मंडळींनी मंडईचा मनमुराद आनंद घेतला.
कुंभकोटची मंडई दरवर्षी जानेवारी महिन्यातच भरविल्या जाते. यावेळी शेतकरी आपापली शेतीची कामे संपवून असतात. शेतकऱ्यांचा हा फावला वेळ असतो. मंडई निमीत्ताने जवळपास सर्व गावात पाहुण्या मंडळी चे आगमन होते. पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. लगेच दुसऱ्या गावात सुद्धा मंडई निमित्ताने हे लोक नंतर त्यांच्या गावी जातात. मंडई निमित्ताने एकमेकांच्या घरी गेल्याने जुने, नवीन नातेसंबंध आणखी दृढ होतात. या निमित्ताने मुलामुलींसाठी उपवर शोधले जातात. तरुण तरुणी आपापल्या पसंतीने भावी सहचर निवडतात. म्हणून या मंडई ला खुप महत्त्व आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने राजमाता देवीचे दर्शन करण्यासाठी दुरदूरून लोक येतात. तसे पाहता या दैवत चा संबंध आदिवासी समाजाशी येतो. परंतु या देवीवर सर्वच धर्माच्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे सर्वच धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतात.
कुंभकोट हे 200 लोकवस्ती चे लहानशे गाव आहे. गावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. मंदीराच्या बाजूने बारमाही वाहणारा ओढा आहे.
निसर्गावर निष्ठा असणारा आदिवासी समाज निसर्गालाच देवी देवतांचे नावे ठेवून पुजा करतात. खऱ्या अर्थाने निसर्गाची जोपासना करीत असते. याचे प्रत्यक्ष अनुभव पहावयास मिळते.
राज मातेचे औपचारिक पुजन तहसीलदार छगन लाल भंडारी यांच्या हस्ते झाले.मंडई मध्ये येणाऱ्या भाविकांची तहान भागविण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पाणपोई उघडण्यात आली होती. पाणपोई चे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी देवीदास देवरे यांच्या हस्ते झाले. मंडई निमित्ताने उद्बोधन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शामलाल मडावी होते. यावेळी मनोज अग्रवाल, आनंद चौबे, शालिकराम कराडे, महादेव बन्सोड आदी उपस्थित होते.
ज्या मंदिरासमोर मंडई भरविली जाते, ते मंदिर ७० वर्षानंतर ही उपेक्षितच आहे. हेच मंदिर शहरात असते तर आजपर्यंत करोडो रूपये खर्च करून विकास झाला असता. या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी देवरे यांच्याशी चर्चा केली असता, तालुक्यातील कुंभकोट देवस्थान आणि तिपागड किल्ला या दोन्ही ठिकाणांना ब दर्जाचा पर्यटनस्थळ मिळावा यासाठी पंचायत समिती स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा झाल्यास पर्यटन स्थळांचा दर्जा मिळू शकते.
पर्यटन स्थळांचा दर्जा मिळाल्यास या ठिकाणी मंदिराच्या बांधकामासोबतच, राहण्याची सोय व ईतर सोयी सुविधा उपलब्ध होतील. असे देवरे म्हणाले.
Comments are closed.