Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि. १३ नोव्हेंबर: बोगस उत्पन्नाचे दाखले बनविणाऱ्या रॅकेटची एका मुख्य दलालासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसीलदारांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यावर महाविद्यालय प्रवेश आणि इतर शासकीय कामाकरिता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. गेल्या महिन्यात हे निकाल लागल्यामुळे नागपूर तहसील कार्यालयात उत्पन्न दाखले व इतर दस्तावेज बनविण्याकरिता विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. तेथे बोगस उत्पन्नाचा दाखला तयार करणारे रॅकेट सक्रीय आहे. हे दलाल काही कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून दाखले तयार करून देतात. नायब तहसीलदार आभा नीलेश वाघमारे (४०) यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून सदर पोलिसांनी चौकशी करीत आरोपी संतोष जैस्वाल (५०) रा. मानेवाडा आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला.

संतोष जैस्वाल आणि त्याचे साथीदार हे नागरिकांकडून कागदपत्र घेऊन बनावट उत्पन्नाचे दाखले तयार करून देत होते. यासाठी जैस्वाल आणि त्याचे साथीदार मोठी रक्कम नागरिकांकडून वसूल करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून बोगस दलालांचे हे रॅकेट तहसील कार्यालयात सक्रीय असून त्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना बोगस दाखले देऊन शासनाची फसवणूक केली. त्यांच्या या अवैध कृत्यात काही कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याची चर्चा आहे. तहसीलदार वाघमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जैस्वाल आणि त्याच्या साथीदारांवर ४२०,४६५,४६८,४७१,३४ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.