Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक

कुडकेली जंगलात कारवाई; पोलिसांची गुप्त माहितीवर आधारित कारवाई अवघ्या २४ तासांत फळाला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट कुडकेली जंगलात सुरू असलेल्या बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३९.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपी फरार आहेत. जिल्हा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संयोजित कृतीमुळे अवैध मद्यनिर्मितीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

जंगलात सुरू होता “दारूचा अड्डा”…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारूविक्री विरोधात आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेला कुडकेली जंगल परिसरात एक बनावट देशी दारूचा अड्डा दोन दिवसांपासून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे १४ मे रोजी रात्रीच पोलीस पथक जंगलात दाखल झाले.

पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी एका होंडा ब्रिओ वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन सोडून जंगलात पलायन केले. संपूर्ण रात्री पोलिसांनी परिसर ताब्यात ठेवत दुसऱ्या दिवशी सकाळी पंचासमक्ष छापा टाकला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छाप्यात उघड झालेला धक्कादायक प्रकार..

या कारवाईत दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्पिरीट, भरलेले ड्रम्स, हजारो बाटल्या, जनरेटर, चारचाकी वाहन, सिलिंग मशिन्स आणि रसायने यांसह ३९.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी जंगलात जप्त केले साहित्य

स्पिरीट ४५०० लिटर – ₹१३.६५ लाख

बनावट दारूचे ड्रम – ₹८.२५ लाख

भरलेल्या बाटल्या (८७००) – ₹६.९६ लाख

होंडा ब्रिओ चारचाकी – ₹४ लाख

जनरेटर, सिलिंग मशिन्स, इतर साहित्य – ₹६.४५ लाख

अटकेत धुळे जिल्ह्यातील चौघे..

या कारवाईत वसंत पावरा (१९), शिवदास पावरा (३५), अर्जुन अहिरे (३३) व रविंद्र पावरा (१८) या धुळे जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली. फरार आरोपींचा शोध सुरू असून, ताडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईमागचे यशस्वी नेतृत्व..

ही धाडसी कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर अधीक्षक एम. रमेश व सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा, विशेष अभियान पथक व प्राणहिता दस्त्याचे जवान या सर्वांची समन्वयात्मक कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

या प्रकरणी तपास अधिकारी सपोनि. भगतसिंग दुलत, पोनि. अरुण फेगडे, सपोनि. राहुल आव्हाड यांच्यासह पोलीस अमलदारांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले.

समाजासाठी मोठा धक्का व पोलिसांची वेळीच हस्तक्षेप..

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जंगलात बनावट दारूचा कारखाना उभारून रसायनांद्वारे आरोग्यविनाशकारी दारू तयार केली जात असल्याची बाब धक्कादायक आहे. परंतु पोलिसांच्या तात्काळ आणि योजनाबद्ध कृतीमुळे मोठा अनर्थ टळला, हे निश्चित.या कारवाईमुळे पोलिसांचे खाकी वर्दीवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.

Comments are closed.