बार्टी’च्या नावाने बनावट योजना व्हायरल – विद्यार्थ्यांची दिशाभूल, संस्थेचा इशारा
अनुसूचित जातीतील ९०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत दोन लाख रुपये देण्यात येतील, असा खोटा प्रचार सुरू..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना’ या नावाने एक योजना व्हायरल होत असून, यामध्ये अनुसूचित जातीतील ९०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत दोन लाख रुपये देण्यात येतील, असा खोटा प्रचार सुरू आहे.
मात्र, बार्टीच्या महासंचालक सुनिल वारे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, सदर योजना २०२१ साली जाहिर करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत ही योजना सुरू नसून, बार्टीतर्फे सध्या अशा स्वरूपाची कोणतीही अनुदान योजना राबविण्यात येत नाही.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांद्वारे ही माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत. या बनावट प्रचारामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून बार्टीकडे मोठ्या प्रमाणावर चौकशी केली जात आहे.
बार्टीने यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही अधिकृत योजना असल्यास ती बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर व सरकारी अधिकृत माध्यमांतूनच जाहीर केली जाते, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असेही बार्टीने स्पष्ट केले आहे.
योजनेचे वास्तव :
*२०२१ मध्ये योजना घोषित झाली होती.
*अंमलबजावणी न झाल्यामुळे सध्या ही योजना अस्तित्वात नाही.
*सोशल मीडियावर सध्या फिरणारी माहिती बनावट आहे.
*बार्टीतर्फे अशा प्रकारची कोणतीही अनुदान योजना राबवली जात नाही.
बार्टीचे आवाहन : विद्यार्थी, पालक व सर्व नागरिकांनी फक्त अधिकृत माध्यमांवरून आलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा. चुकीच्या माहितीचा प्रसार करणे कायद्यानुसार गुन्हा असून, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते.
Comments are closed.