Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. ९ नोव्हेंबर: एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे. तरीही ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांना आजच एका महिन्याचे पगार देण्याची केलेली घोषणा म्हणजे तात्पुरती मलपटटी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचा-यांना सरकारकडून अर्धवट न्याय मिळाला आहे, पण जोपर्यंत कर्मचा-यांना पुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

वेतन न दिल्यामुळे एसटी कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. काल जळगाव येथे मनोज चौधरी व आज रत्नागिरीत पांडुरंग गडदे या एसटी चालकाने गळफास लावून आत्महत्या केली, या दोन्ही घटना या सरकारला शोभा देणा-या नाहीत, तसेच मनोज चौधरी यांनी आत्महत्या करतांना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये एसटीच्या व्यवस्थेवर आरोप केलाय व या अव्यवस्थेला एसटी महामंडळ व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. एसटी कर्मचा-यांच्या चिठ्ठीत ठाकरे सरकारचे नाव आहे. त्यामुळे जर अर्णब गोस्वामी यांचे नाव अन्वय नाईक प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली मग आता ठाकरे सरकारमध्ये कोणावर गुन्हा दाखल करणार असा स्पष्ट सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारविरुध्द भारतीय दंड संहिता ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परिवहन मंत्र्यांनी आज घाईघाईत केलेल्या घोषणेमुळे एसटी कर्मचा-यांना पूर्ण न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत एसटी कर्मचा-यांना सर्व महिन्यांचा पगार मिळत नाही तोपर्यंत भाजपाचा संर्घष सुरु राहणार आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.