गडचिरोली ‘जीडीसीसी’ला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्रदान :
सलग नवव्या वर्षी कोरले नाव, ३७० बँकांतून निवड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ‘बँको ब्ल्यू रिबन’ या पुरस्कारासाठी सलग नवव्यांदा निवड झाली आहे. दि. २८ जानेवारी २०२५ रोजी लोणावळा येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे
जिल्हा सहकारी बँकांना व नागरी सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँको समितीतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२४ ची घोषणा १३ डिसेंबरला झाली. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग नवव्यांदा या पुरस्कारावर नाव कोरणारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही एकमेव बँक आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक वर्ष सन २०२३-२४ या वर्षात रु. २,५०० कोटी ते रु. ३,००० कोटींच्या ठेवी असलेल्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव वृद्धी तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निकषानुसार एन.पी.ए.चे प्रमाण,सी.आर.ए. आर. आदी निकष पूर्ण केले. यापूर्वी बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे सन २०१८, २०२२ व २०२४ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळवलेला आहे. नुकतेच आरबीआयने ‘जीडीसीसी’ला इंटरनेट बॅकींगचा परवाना मिळालेला आहे. बँकेने ३ हजार ७०६ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला असून ४ हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे तसेच बँकेच्या ठेववृद्धीमध्ये १८ ते २० टक्के वाढ झालेली आहे. बँकेचे अध्यक्ष प्रचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी या यशाचे श्रेय ठेवीदार, शेतकरी, बचत गट व सभासदांना दिले आहे.
हे ही वाचा,
Comments are closed.