गडचिरोली पोलीस दलाच्या ‘सायबर दुत’ मोबाईल व्हॅन गावोगावी भेट देऊन करणार जनजागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढत आहे. गडचिरोली पोलीस दलाद्वारे गडचिरोलीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळया विषयां संबंधी जनजागृती केली जात असते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आज दि. 12 मार्च 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते ‘सायबर दुत’ मोबाईल व्हॉनचे अनावरण करण्यात आले.
गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागांमध्ये अजूनही माबाईल व इंटरनेटच्या वापराबाबत परिपुर्ण प्रमाणात जागृती नाही. आजच्या काळात इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे, सायबर अपराध ही समस्या उग्र रूप धारण करत आहे. सध्या फोन व मॅसेजच्या माध्यमातून विविध प्रकारे सायबर गुन्हे घडत आहेत यामध्ये डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन गेमींग फसवणूक, शासकिय योजनांच्या नावाने फसवणूक, व्हॉटस् अॅप व्हिडीओ कॉलद्वारे पैसे उकळणे यांचे प्रमाण अधिक आहे. यावर पायबंद व्हावा, यापुढे लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक हे सायबर साक्षर व्हावेत या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे या सायबर दुत मोबाईल व्हॅनची संकल्पना सुरु करण्यात आली आहे. सदर फिरते सायबर दुत वाहन हे गडचिरोली जिल्ह्यातील वर्दळीच्या ठिकाणी जसे – शाळा, महाविद्यालये, बाजार, चौक तसेच बस स्थानक यांसारख्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ-ऑडीओद्वारे तसेच पोस्टर व बॅनरद्वारे लोकांना सायबर साक्षर करण्यात हातभार लावणार आहे तसेच सायबर गुन्हयांविषयी माहिती देणार आहेत. सदर फिरत्या वाहनाच्या माध्यमातून गडचिरोलीतील नागरिकांना सायबर साक्षर होण्याविषयी शपथ देखील देण्यात येणार आहे.
सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. व्हि. सत्यसाई कार्तिक हे उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायबर पोलीस स्टेशन गडचिरोलीचे अरुण फेगडे, नेहा हांडे व अंमलदारांनी विषेश परिश्रम घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी असे आवाहन केले आहे की, “मोबाईल व इंटरनेटच्या वापराविषयी जागरुक राहून आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणुक झाल्यास किंवा गुन्हा घडल्यास सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तात्काळ तक्रार नोंदवावी.”