पुष्पवृष्टी आणि गणरायाच्या जयघोषात दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशजन्म साजरा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने गणेशजन्म सोहळा ; पुष्पवृष्टी व आकर्षक आरास
पुणे डेस्क, दि. १५ फेब्रुवारी: गजवदना पतित पावना…बाळा जो जो रे…निद्रा करी बाळा, मृत्युंजय नंदना बाळा जो जो रे… असा पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. पाळण्यावर केलेली पुष्पवृष्टी आणि ओम् गं गणपतये नम: च्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक १२ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठया थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक सजावट आणि गाभा-यात केलेली पुष्पआरास डोळ्यात साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्याकरीता प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने विनायक अवतार गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. अर्चना भालेराव यांनी गणेशजन्म सोहळ्यात महिलांचे प्रतिनिधीत्व केले. यावेळी अथर्वशिर्ष सादर करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण, ,सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने यांनी गणरायाचे पूजन केले.
सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत इंडियन आयडॉल फेम नंदिनी व अंगद गायकवाड यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकाद्वारे गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. प्रात: कालीन आरती सकाळी ७.१५ वाजता झाली. दिवसभरात सकाळी ७ ते १०.३० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेश याग पार पडला. दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत सहस्त्रावर्तने झाली. तर, रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली.
Comments are closed.