शासकीय परीक्षांमुळे विद्यापीठ परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाची महत्त्वपूर्ण घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठाने उन्हाळी २०२५ परीक्षेत शासकीय व सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यापीठ परीक्षांना मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या परिपत्रकानुसार, अशा विद्यार्थ्यांना सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपली साक्षांकित प्रवेशपत्र प्रत संबंधित महाविद्यालयात तात्काळ जमा करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच संबंधित महाविद्यालयांनी सर्व तपशील एक्सेल शीटच्या स्वरूपात तयार करून [email protected] या ईमेलवर पाठवणे आवश्यक आहे. या माहितीसोबतची हार्ड कॉपी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कार्यालयातही जमा करावी लागेल.
गोंडवाना विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विविध केंद्रीय, राज्यस्तरीय किंवा CET प्रकारच्या प्रवेश परीक्षेमुळे विद्यापीठाच्या परीक्षांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे की, ही संधी केवळ शासकीय परीक्षांमुळे अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती वेळेत सादर करून त्यांना या संधीचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
Comments are closed.