गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात 40 क्युमे विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोसीखुर्द धरणातून १२ एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता वैनगंगा नदीपात्रात 40 क्युमेंकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग, गडचिरोली यांनी महत्त्वपूर्ण सुचना प्रसिद्ध करत नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी, मत्स्यव्यावसायिक तसेच संबंधित प्रशासन यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वैनगंगा नदीकिनारी असलेले वडसा, आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नदीपात्रात शेती करणारे शेतकरी, मासेमारी करणारे व्यक्ती, नदीकिनारी गुरे पाणी पिण्यासाठी नेणारे लोक, तसेच पूल, रस्ते बांधकाम करणारे सर्वजण आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, नदीपात्रातील अडथळे दूर करण्याचे आवाहन संबंधित ग्रामपंचायतींना व मत्स्यव्यावसायिकांना करण्यात आले आहे, जेणेकरून कोणताही अपघात किंवा अडथळा निर्माण होणार नाही.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहण्याचे आवाहन केले असून संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments are closed.